मेरशीतील खड्डे न बुजवल्यास आंदोलन

काँग्रेस नेते अमित पालेकर यांचा इशारा; पेयजल खात्याने मे महिन्यात मेरशी चर्च जवळील रस्ता जलवाहिनी घालण्यासाठी फोडला होता. दिवाळीच्या आधी हे काम पूर्ण न केल्यास मेरशी जंक्शन वर बसून आंदोलन करण्यात येईल असा इशारा काँग्रेस नेते अमित पालेकर यांनी दिला.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
31 mins ago
मेरशीतील खड्डे न बुजवल्यास आंदोलन

पणजी: पेयजल खात्याने मे महिन्यात मेरशी चर्च जवळील रस्ता जलवाहिनी घालण्यासाठी फोडला होता. आत नोव्हेंबर महिना सुरू होणार असून अद्याप या रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. येथील खड्डे बुजवण्यात आलेले नाहीत. स्थानिक पंचायत, आमदार याकडे दुर्लक्ष करत आहे. दिवाळीच्या आधी हे काम पूर्ण न केल्यास मेरशी जंक्शन वर बसून आंदोलन करण्यात येईल असा इशारा काँग्रेस नेते अमित पालेकर यांनी दिला.
गुरुवारी त्यांनी खात्याच्या अभियंत्यांची भेट घेऊन याविषयी निवेदन दिले. यावेळी स्थानिक रहिवासी उपस्थित होते.
पालेकर यांनी सांगितले की, जलवाहिनीचे काम १८ मे रोजी सुरू झाले होते. कामाच्या पद्धती बाबत आक्षेप असल्याने काही काम बंद ठेवण्यात आले. मात्र नंतर सुरक्षा रक्षक ठेवून काम सुरू करण्यात आले. तेव्हा काम पंधरा दिवसांत पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. आज ऑक्टोबर महिना संपत आला तरी काम पूर्ण झालेले नाही. पुढील आठवड्यात येथील चर्चचे फेस्त सुरू होणार आहे. तसेच दिवाळी देखील आहे. यामुळे या रस्त्यावरील लगबग वाढणार आहे. त्यामुळे या फेस्त, सणाच्यापूर्वी येथील काम पूर्ण करणे आवश्यक आहे.
ते म्हणाले, भाजप सरकारला लोकांची कामे करायची नाहीत. त्यामुळे आंदोलन केले तरच सरकारला जाग येते. रस्त्याचे काम झाले नाही तर सांताक्रुझ मतदारसंघातील सर्वांनीच मेरशी सिग्नल जवळ होणाऱ्या आंदोलनात सहभाग घ्यावा. विकासाच्या नावाने काँग्रेस मधून भाजपमध्ये गेलेल्या आमदारांना मतदारंसघातील साधी कामे करणे जमत नाही. त्यांच्याच गटातील लोक राजकारण करून कामे करू देत नसल्याचे आमदारांनी कबूल केले आहे. आमदारांनी त्यांच्या आईने काय केले हे सांगण्यापेक्षा, मागील साडेचार वर्षांत त्यांनी काय काम केले ते सांगावे.
सरकार एका बाजूला व्हायब्रंट गोवा करत आहे. तर दुसऱ्या बाजूला ग्रामीण भागात अद्याप मूलभूत सुविधा पोहोचल्या नाहीत. सांता क्रुझ मतदारसंघात एक सार्वजिक शौचालय बांधण्यात येणार होते. मात्र अद्याप ते काम देखील झालेले नाही. कामाची किंमत ५० लाख रुपये आहे. मात्र निधी नसल्याने काम थांबले आहे. सरकारकडे इव्हेंट करण्यासाठी कोट्यवधी रुपये आहेत. मात्र मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी काही लाख रुपये नाहीत. हे भाजप सरकारचे अपयश असल्याची टीका पालेकर यांनी केली.

हेही वाचा
सर्व पहा