पणजी: गोव्यात चांगल्या दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण झाल्या आहेत. येथील विमानतळ, बंदर, रस्ते उद्योग क्षेत्रासाठी उपयुक्त ठरत आहेत. राज्य सरकारने उद्योग स्नेही धोरणे देखील तयार केली आहेत. याचा लाभ घेण्यासाठी उद्योगांनी गोव्यामध्ये गुंतवणूक करावी असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी केले.
गुरुवारी व्हायब्रंट गोवा जागतिक परिषदेच्या (Vibrant Goa Global Summit) उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार सदानंद शेट तानावडे, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु, राजकुमार कामत, हिरो एंटरप्राइजेसचे सुनील कांत मुंजाल व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, व्हायब्रंट गोवा परिषदेमध्ये जगभरातल्या ५० देशातील ५०० हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. ही गोव्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. परिषदेमुळे गोव्याच्या गुंतवणूक क्षेत्राचे भविष्य उज्वल होणार आहे. गोव्यातील उद्योग क्षेत्राला गुंतवणूक, तांत्रिक प्रगती , नाविन्यता आणण्यासाठी ही खूप मोठी संधी आहे. सर्व गोमंतकीयांनी या परिषदेला भेट द्यावी. आपले छोटे अथवा मोठे उद्योग व्यवसाय जागतिक स्तरावर नेण्यासाठी ही मोठी संधी आहे. विशेष करून तरुण उद्योजकांनी याचा लाभ घ्यावा. सरकारने याआधीही उद्योग क्षेत्राला पाठिंबा दिला आहे आणि यापुढेही देणार आहे.
सुनील कांत मुंजाल म्हणाले की, गोवा पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रासाठी चांगले ठिकाण आहे. गोवा इव्हेंट आणि परिषदा आयोजित करण्यासाठी देखील आघाडीवर आहे. यापुढे देखील येथील चांगल्या गोष्टींचे रक्षण करून प्रगती करावी. सध्याच्या काळात एआय आणि अन्य तंत्रज्ञानाने आघाडी घेतली आहे. यामुळे कदाचित काही जणांच्या नोकऱ्या जाऊ शकतात. मात्र योग्य कौशल्य शिक्षण, प्रशिक्षण घेतल्यास भविष्यात एआय क्षेत्रामध्येच अधिक नोकऱ्या उपलब्ध होतील.
स्थानिकांना फायदा झाला पाहिजे
सुरेश प्रभू म्हणाले की, संपूर्ण देशात सध्या गुंतवणूक करणे, उद्योग करण्यासाठी गोवा हेच चांगले ठिकाण आहे. येथील मनुष्यबळ देशात सर्वात चांगले आहे. उद्योगांनी गोव्यामध्ये यावे. गोव्यात होणाऱ्या गुंतवणुकीचा फायदा स्थानिकांना झाला पाहिजे.


