वास्कोतील आग आटोक्यात; प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे : मुख्यमंत्री

सुरक्षेला प्राधान्य; बाधितांना नुकसान भरपाई देणार : मुख्यमंत्र्यांची ग्वाही; आगीमुळे बाधित झालेले परिसरातील नागरिक तसेच इतर सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि सुरक्षेसंदर्भातील सूचनांचे पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी केले आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
1 hours ago
वास्कोतील आग आटोक्यात; प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे : मुख्यमंत्री

वास्को : येथील न्यू मॉर्डन मार्केटला लागलेली आग (Vasco New Morden Market Fire Incident) आता पूर्णपणे नियंत्रणात आली आहे. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर व्यापारी आणि परिसरातील रहिवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे. आगीमुळे बाधित झालेले परिसरातील नागरिक तसेच इतर सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि सुरक्षेसंदर्भातील सूचनांचे पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant)  यांनी केले आहे. बाधितांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारीचे उपाय योजण्यात आले आहेत. त्यामागे कोणतीही अनुचित घटना घडू नये हा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नुकसानीचा आढावा घेणे सुरू

आगीमुळे झालेल्या नुकसानीचा सविस्तर आढावा संबंधित सरकारी विभागांकडून घेतला जात आहे. या दुर्दैवी घटनेमुळे नुकसान सहन करावे लागलेल्या व्यापारी आणि इतर बाधित व्यक्तींच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे आहे. आवश्यक ती मदत दिली जाईल. तसेच, बाधितांना आर्थिक नुकसानभरपाई देण्याबाबतही सरकार आवश्यक ती कार्यवाही करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले.

सरकार बाधितांच्या पाठीशी : मुख्यमंत्री

‘जनतेची सुरक्षा आणि कल्याण हेच सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे,’ असे सांगत मुख्यमंत्र्यांनी या कठीण प्रसंगी बाधितांना आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली. आगीमुळे झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन पूर्ण झाल्यानंतर पुढील मदतीबाबतची कार्यवाही होणार आहे.

दरम्यान, दिवाळी जवळ आली असताना रात्री उशीरा लागलेल्या आगीमुळे वास्कोतील  न्यू मॉर्डन मार्केटमधील व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. आग नेमकी कशी लागली व त्यात नेमके किती नुसान झाले याचा आढावा घेतला जात आहे.

हेही वाचा
सर्व पहा