बाळ्ळी येथे विंगर टेम्पोची कंटेनरला धडक; १४ कामगार जखमी

महामार्गावरील वाहतूक दोन तास खोळंबली; बाळ्ळी येथील बँक ऑफ बडोदा शाखेजवळ बुधवारी सकाळी एका विंगर टेम्पोने समोरील कंटेनर ट्रकला पाठीमागून धडक दिली. या भीषण अपघातात टेम्पोतील १४ कामगार जखमी झाले.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
15 mins ago
बाळ्ळी येथे विंगर टेम्पोची कंटेनरला धडक; १४ कामगार जखमी

मडगाव : बाळ्ळी येथील बँक ऑफ बडोदा शाखेजवळ बुधवारी सकाळी एका विंगर टेम्पोने समोरील कंटेनर ट्रकला पाठीमागून धडक दिली. या भीषण अपघातात टेम्पोतील १४ कामगार जखमी झाले. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत. पण सुमारे दोन तास महामार्गावरील वाहतूक खोळंबली. 

कुंकळ्ळी पोलिसांनी  (Cuncolim Police) दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात सकाळी सुमारे १०:३० वाजता राष्ट्रीय महामार्गावर घडला. पारुल विद्यापीठाच्या कामगारांना घेऊन हा विंगर टेम्पो मडगावच्या दिशेने जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.  आणि टेम्पोची थेट समोरील कंटेनरला धडक बसली.

अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि मदत पथकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातात जखमी झालेल्या सर्व १४ जणांना प्रथम बाळ्ळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. त्यापैकी ६ कामगारांना पुढील उपचारासाठी मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात (South Goa District Hospital)  हलवण्यात आले आहे. सर्व जखमींची प्रकृती स्थिर असून धोका टळल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.

वाहतूक दोन तास विस्कळीत

 या अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून रस्ता मोकळा करेपर्यंत सुमारे दोन तास महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या प्रकरणी कुंकळ्ळी पोलीस ठाण्याचे हवालदार संजय गावकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पोलीस अपघाताचा पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा
सर्व पहा