कोलवाळ : राज्यात भरधाव वाहनांच्या अपघातांचे सत्र सुरूच आहे. त्यात बळी जाण्याबरोबरच गंभीर जखमी होण्याचे प्रमाणही गेल्या काही दिवसांत वाढले आहे. कोलवाळ येथील राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी सकाळी हिट अँड रनचा थरार घडला. hit-and-run incident at Colvale; Two girls seriously injured). या भीषण अपघातात अनामिका गुरव आणि रुपाली वैदरडे या दोन पादचारी युवती गंभीर जखमी झाल्या आहेत. अपघातानंतर संबंधित कारचालक घटनास्थळावरून पळून गेला. त्याचा शोध सुरू आहे.
या घटनेमुळे महामार्गावरील पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. भरधाव वाहनांच्या धडकेत निष्पाप पादचाऱ्यांना गंभीर दुखापतींना सामोरे जावे लागत आहे. अपघातानंतर जखमींना मदत करण्याऐवजी घटनास्थळावरून पळ काढण्याच्या प्रकारांबाबत चिंता व्यक्त होत आहे.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडून अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात कारचा शोध सुरू आहे. कारचालकाची ओळख पटवून त्याच्यावर कारवाई करण्यासाठी कोलवाळ पोलीस (Goa Police) तपास करत आहेत.
अपघातांचे सत्र सुरूच
दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांत अपघातांचे सत्र वाढत आहे. मांडवी पुलावर सोमवारी पहाटे ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात भरधाव पर्यटक टॅक्सीने दुचाकीला धडक दिल्याने दोन विद्यार्थ्यांचा बळी गेला होता. तिघेजण गंभीर जखमी झाले होते. गोवा वेल्हा येथे लष्करी वाहनाची धडक दुचाकीला बसून मितेश शेट या २२ वर्षीय युवकाला जीव गमवावा लागला होता. अशाचप्रकारे छोट्यामोठ्या अपघतांचे सत्र सुरू आहे. त्यात उमद्या युवकांचे नाहक बळी जात आहेत तर अनेकजण जायबंदी होत आहेत.


