राज्य कार्यकारिणी बैठकीत भाजपाध्यक्ष नितीन नबीन यांचे स्वागत करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत दामू नाईक, डॉ. भारती पवार, मंत्री विश्वजीत राणे व इतर. (कैलास नाईक)
गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी
गोव्याची विधानसभा निवडणूक जानेवारीत जाहीर होण्याची शक्यता आहे. येत्या दोन महिन्यांत कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत सरकार आणि पक्षाचे कार्य पोहोचवावे. गोव्यातील विजय हा २०२९ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीला विजयाची दिशा दाखवणारा ठरेल, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी केले. भाजप राज्य कार्यकारिणी बैठकीत नितीन नबीन बोलत होते.
बैठकीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, गोवा प्रभारी डॉ. भारती पवार, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्यासह मंत्री, आमदार, नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नितीन नबीन यांनी भाषणात काँग्रेससह राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. गोव्याच्या निवडणुकीत पक्षाला ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळाली, तर पक्ष पूर्वीचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढेल. यासाठी सर्व बूथवर संपर्क अभियान राबवण्याची गरज आहे. ‘विकसित भारत’चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा भाजपला विजयी करण्याची गरज आहे.
‘आत्मनिर्भर भारत’चे स्वप्न पूर्ण करत असतानाच, २०३७ पर्यंत विकसित गोवा करण्याचे स्वप्न आहे. डबल इंजिन सरकारच्या कार्यकाळात गोव्याचा अर्थसंकल्प ३२ हजार कोटी रुपयांवर पोहोचला आहे. भाजप सरकार चालवते, तेव्हा ते देशाची सेवा करण्यासाठी चालवते. काँग्रेसने सत्ता चालवताना फक्त एकाच परिवाराची सेवा केली. गोव्याच्या जनतेची सेवा तसेच राज्याचा विकास करण्यासाठी गोव्यात पुन्हा भाजप सरकार येण्याची गरज आहे. आगामी दोन महिन्यांत कार्यकर्त्यांनी सरकार आणि पक्षाचे कार्य लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. राज्यात तसेच केंद्रात भाजप सरकार ‘अंत्योदय’ तत्त्वावर काम करत आहे. किसान सन्मान, नारी शक्तीला सोबत घेऊन सरकारचे कार्य सुरू आहे.
कुणबी साडीचा अनादर ही काँग्रेसची मानसिकता
अपप्रचार तसेच दिशाभूल करून देशात अराजकता निर्माण करण्याचे काम काँग्रेस करत आहे. गोवा भेटीदरम्यान राहुल गांधी यांनी कुणबी साडीचा अनादर केला. कुणबी साडीचा अनादर हा गोव्याच्या संस्कृतीचा अपमान आहे. ज्या माणसावर योग्य संस्कार झाले नाहीत, त्याच्याकडून संस्कृतीचा आदर कसा होणार? काँग्रेसचा पराभव होतो, तेव्हा लोकशाही धोक्यात असल्याचा आरोप केला जातो. मात्र, काँग्रेसला विजय मिळतो, तेव्हा लोकशाही जिवंत असल्याचे ते सांगतात. काँग्रेसने आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा केली नाही, तर जनता त्यांना धुळीस मिळवेल. संविधान आणि एसआयआर मुद्द्यांवर आम्ही चर्चा करण्यास तयार आहोत.
काँग्रेसकडून पराभवाचे खापर इतर यंत्रणांवर
पूर्वी काँग्रेस पराभवासाठी ईव्हीएमला दोष देत होती, आता ते एसआयआरला दोष देत आहेत. तामिळनाडू आणि केरळमध्ये काँग्रेसला विजय मिळाला, तिथे त्यांनी एसआयआरला दोष दिला नाही. मात्र, बंगालमध्ये पराभव झाला तेव्हा एसआयआरला दोष दिला. एसआयआर ही एक नियमित चालणारी प्रक्रिया आहे. काँग्रेसचे बूथ पातळीवरील कार्यकर्तेच आता काँग्रेसला सहकार्य करत नसल्याचा आरोपही नबीन यांनी केला.


