पणजी : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उमेदवारीवर दावा करण्यासोबतच इच्छुकांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत माजी मंत्री आणि आमदार दिलीप परुळेकर व मनोहर आजगावकर यांनी उमेदवारीवर दावा केला. उमेदवारी मिळाल्यास निवडणूक लढवणारच, असे दोघांनीही स्पष्ट केले.
भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक मंगळवारी अटल भवनात झाली. या बैठकीला भाजपचे मंत्री, आमदार, पदाधिकारी तसेच माजी मंत्री आणि आमदार उपस्थित होते. त्यात माजी मंत्री मनोहर आजगावकर, दिलीप परुळेकर, विश्वास सतरकर, विनय तेंडुलकर आणि सिद्धार्थ कुंकळ्येकर यांचा समावेश होता. पणजी, सांताक्रूझ, म्हापसा, पेडणे, साळगाव आणि इतर मतदारसंघांत भाजपचे आमदार असतानाही माजी आमदारांनी उमेदवारीवर दावा केल्याने विद्यमान आमदारांसह पक्ष नेतृत्वासमोर पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
साळगावमधून परुळेकर इच्छुक
साळगावचे विद्यमान भाजप आमदार केदार नाईक यांच्यासमोर माजी मंत्री दिलीप परुळेकर यांनी उमेदवारीचा दावा केला आहे. निवडणूक लढवण्यास आपण इच्छुक असून साळगावमधून आपल्यालाच भाजपची उमेदवारी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपण सुरुवातीपासूनच पक्षासाठी काम करत असल्याचेही परुळेकर यांनी सांगितले.
पेडण्यातून आजगावकर यांचा दावा
माजी मंत्री मनोहर आजगावकर यांनी पेडणे मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीवर दावा केला आहे. या मतदारसंघात आपण मोठ्या प्रमाणात काम केले असून निवडणूक लढवण्याची आपली इच्छा आहे. पेडण्यातून आपण निवडणूक लढवणारच, असे त्यांनी स्पष्ट केले. पेडण्याचे विद्यमान भाजप आमदार प्रवीण आर्लेकर आहेत.
मोपा विमानतळाचा पेडण्याला लाभ नसल्याचा दावा
आपल्या कार्यकाळात मोपा विमानतळाचे काम झाले. विमानतळासाठी एक लाख चौरस मीटर जमीन संपादित करण्यात आली. मात्र, त्याचा पेडणेतील लोकांना लाभ झालेला नाही, असा दावा आजगावकर यांनी केला. विमानतळ परिसरातील टॅक्सी पार्किंगचा प्रश्नही कायम असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे पेडण्यातील लोकांना आपण हवे असल्याचे ते म्हणाले.
आपल्या कार्यकाळात पेडण्यातील एक हजार लोकांना नोकऱ्या दिल्याचा दावा करत, या भागात आणखी रोजगारनिर्मितीची गरज असल्याचे आजगावकर यांनी सांगितले.
उमेदवार नव्हे, पक्षाचे चिन्ह पाहून काम करा!
राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी कार्यकर्त्यांना उमेदवाराऐवजी पक्षाचे कमळ हे चिन्ह पाहून काम करण्याचे आवाहन केले. वैयक्तिक हेवेदावे आणि स्वार्थ बाजूला ठेवून पक्षासाठी काम करावे, असे त्यांनी सांगितले.


