पणजी : चिंबल येथे १९२८ मध्ये जेथे ऐतिहासिक शुद्धीकरण झाले, ती वास्तू आणि तेथील मूर्तींचे पूर्णपणे जतन केले जाईल. त्या जागेची सद्यस्थिती आणि कायदेशीर बाबी जाणून घेतल्यानंतर सरकारकडून योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले. डॉ. मधू घोडकिरेकर लिखित ‘गोमांतक शुद्दीचो इतिहास’ या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले, त्या प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.
या सोहळ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांचे मुख्य भाषण झाले. यावेळी कला आणि संस्कृती मंत्री रमेश तवडकर, लेखक डॉ. मधू घोडकिरेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी होसबाळे म्हणाले की, गोव्यातील इन्क्विझिशनचा इतिहास आणि त्या काळातील घटनांचे जतन होणे अत्यंत गरजेचे आहे. १९२८ मध्ये धर्मांतरित झालेल्या ७,८१५ लोकांचे पुन्हा हिंदू धर्मात परिवर्तन होणे ही इतिहासातील एक अत्यंत मोठी आणि अभूतपूर्व घटना होती. या संपूर्ण ऐतिहासिक वारशाची पुढील पिढीसाठी जपणूक झाली पाहिजे, यावर त्यांनी भर दिला.
गोवा आणि येथील संस्कृतीविषयी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, गोव्यावर अनेक राजवटी आल्या, ज्यामध्ये कदंबकालीन राजवट हे गोव्याच्या इतिहासातील ‘सुवर्णयुग’ ठरले. मात्र, पोर्तुगीजांच्या काळात मोठ्या प्रमाणावर धर्मांतरण झाले. इतर प्रांतांतील लोकांनी जितका अन्याय सहन केला नसेल, तितका भीषण अन्याय गोमंतकीय जनतेने सोसला आहे. पोर्तुगीजांनी गोव्यात हजारो मंदिरे उद्ध्वस्त केली.
सध्या राज्य सरकार उद्ध्वस्त झालेली मंदिरे पुन्हा उभारण्यासोबतच गोव्याच्या खऱ्या इतिहासाचे जतन करण्याचे काम वेगाने करत आहे. चिंबल येथील ज्या वास्तूत लोकांचे शुद्धीकरण झाले होते, ती ऐतिहासिक वास्तू आणि तेथील मूर्तींचे जतन निश्चितपणे केले जाईल. यासाठी ती जागा सध्या कोणाच्या ताब्यात आहे याची कायदेशीर पडताळणी प्रथम केली जाईल, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमादरम्यान मंत्री रमेश तवडकर आणि लेखक डॉ. मधू घोडकिरेकर यांचीही मनोगते झाली.


