पार्सेकरांचा उद्या भाजपप्रवेश; उत्पलचा प्रवेश तूर्तास लांबणीवर

भाजपचे अध्यक्ष नितीन नबीन यांच्या उपस्थितीत माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा भाजपप्रवेश निश्चित झाला आहे. मात्र, माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर यांचा भाजपप्रवेश सध्या लांबणीवर पडला आहे.


9 mins ago
पार्सेकरांचा उद्या भाजपप्रवेश; उत्पलचा प्रवेश तूर्तास लांबणीवर

गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी
भाजपचे अध्यक्ष नितीन नबीन यांच्या उपस्थितीत माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा भाजपप्रवेश निश्चित झाला आहे. मात्र, माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर यांचा भाजपप्रवेश सध्या लांबणीवर पडला आहे. मी सध्या गोव्याबाहेर असून कोणताही निर्णय घेण्यापूर्वी भाजप नेत्यांशी पुन्हा एकदा चर्चा होईल, असे उत्पल पर्रीकर यांनी स्पष्ट केले आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन २७ रोजी दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते राज्य कार्यकारिणीच्या बैठकीसह पक्षाच्या संघटनात्मक कामाचा आढावा घेणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. नबीन यांच्या दौऱ्यापूर्वी पक्षाच्या प्रभारी डॉ. भारती पवार आणि सह-सरचिटणीस शिवप्रकाश यांनी गोव्यातील पदाधिकारी व विविध आघाड्यांच्या कार्यकर्त्यांसोबत बैठका घेतल्या आहेत.
याच दरम्यान लक्ष्मीकांत पार्सेकर आणि उत्पल पर्रीकर यांच्यासाेबत बैठक झाली होती. या बैठकीनंतर दोन्ही नेते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी वर्तवली होती. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले की, भाजपसोबत माझे नाते अनेक वर्षांचे आहे. राज्यातील पक्षाच्या वाढीसाठी मी घाम गाळला आहे. २०२२ च्या निवडणुकीत मी अपक्ष म्हणून लढलो असलो तरी इतर कोणत्याही पक्षात प्रवेश केला नव्हता. त्यामुळे माझी ही ‘घरवापसी’ वगैरे नाही.
भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या मते, पक्षाच्या विचारसरणीचे जे नेेते काही कारणास्तव दूर गेले होते, त्यांना पुन्हा जवळ आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याच धोरणांतर्गत या दोन्ही नेत्यांशी चर्चा करण्यात आली आहे.
या दोन नेत्यांच्या भाजप प्रवेशाच्या शक्यतेमुळे गोव्यातील राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत मिळत आहेत. मांद्रे मतदारसंघातील २०२२ च्या विधानसभा निवडणुकीतील भाजपचे उमेदवार व माजी आमदार दयानंद सोपटे म्हणाले, पार्सेकर यांना पक्षात परत आणण्यासाठी मी स्वतः प्रयत्न केले आहेत.

मी सध्या गोव्याबाहेर आहे. त्यामुळे तूर्तास माझा भाजपप्रवेश होणार नाही. भाजप नेत्यांसोबत सध्या माझी केवळ एकच बैठक झाली आहे. आणखी चर्चा होणे आणि इतर अनेक गोष्टींवर विचार करणे गरजेचे आहे.
_ उत्पल पर्रीकर

पक्षाच्या विचारसरणीचे जे नेेते काही कारणास्तव पक्षापासून दूर गेले होते, त्यांना पुन्हा जवळ आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याच धोरणाअंतर्गत या पार्सेकर आणि पर्रीकर यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे.
_ दामू नाईक, प्रदेशाध्यक्ष, भाजप

हेही वाचा
सर्व पहा