धारबांदोडा येथील ग्रामसभेला उपस्थित सरपंच दामोदर नाईक व इतर.
....
गोवन वार्ता प्रतिनिधी
फोंडा
धारबांदोडा येथील सर्वे क्रमांक १९३/१ या आयडीसीच्या जागेवर इथेनॉल प्रकल्प उभारण्यासाठी, तसेच धडे-धारबांदोडा येथे हॉटमिक्स प्रकल्प सुरू करण्याला ग्रामसभेत लोकांनी विरोध केला. त्याचबरोबर प्रशासकीय इमारतीत स्थानिक आमदाराने २०२२ पासून सुरू केलेल्या कार्यलयाचे भाडे घेण्याचा ठराव रविवारी झालेल्या ग्रामसभेत घेण्यात आला. धारबांदोडा पंचायतीची ग्रामसभा रविवारी सकाळी सरपंच दामोदर नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी इतर पंच व ग्रामस्थ उपस्थित होते.
धारबांदोडा येथील सर्वे क्रमांक १९३/१ या आयडीसीच्या जागेवर इथेनॉल प्रकल्प उभारण्यासाठी काही दिवसांपूर्वी भू-संपादनासाठी सुरू केलेले सर्व्हेचे काम स्थानिक लोकांनी रोखून धरले होते. ग्रामसभेत स्थानिक लोकांनी इथेनॉल प्रकल्पाला विरोध करण्याचा ठराव घेतला. स्थानिक लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय सरकारने कोणताही प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेऊ नये, अशी विनंती करण्यात आली.
धडे-धारबांदोडा येथे हॉटमिक्स प्रकल्प उभारण्यासाठी स्थानिक पंचायतीने भविष्यात परवानगी देऊ नये. एका खासगी जागेत प्रकल्प उभारण्यासाठी पंचायतीतर्फे परवानगी देण्यात आली होती. पण प्रकल्पमुळे स्थानिक लोकांच्या आरोग्यावर परिणाम होणार असल्याने ग्रामस्थ प्रकल्पाला विरोध करत आहेत. ग्रामसभेत ग्रामस्थांनी प्रकल्पला विरोध केल्यानंतर सरपंच दामोदर नाईक म्हणाले की, खासगी जागेच्या मालकाने अाजपावेतो आवश्यक असलेली कागदपत्रे दाखल केलेली नाहीत. त्यामुळे खासगी जागेच्या मालकाला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात येणार आहे. प्रकल्पासाठी आवश्यक परवाने पंचायतीकडून दिले जाणार नाहीत, असे आश्वासनही सरपंचांनी ग्रामस्थांना दिले.
धारबांदोडा येथील प्रशासकीय इमारतीत स्थानिक पंचायतीसाठी दोन कार्यलये देण्यात आली होती. त्यापैकी एका कार्यलयात २०२२ पासून स्थानिक आमदाराचे कार्यालय सुरू आहे. सदर कार्यालयाचे भाडे स्थानिक आमदाराकडून घेण्याचा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला. माजी सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक प्रभू पाऊस्कर यांनी धारबांदोडा येथे एका दुकानात खासगी कार्यालय सुरू करून अंदाजे ३० हजार रुपये भाडे देण्याची सोय केली होती. वापरात असलेल्या कार्यालयाच्या भाड्यांमुळे पंचायतीच्या महसूल उत्पन्नात वाढ होणार आहे. त्यामुळे पंचायतीच्या जागेत सुरू केलेल्या कार्यलयाचे भाडे पंचायतीला मिळण्यासाठी ग्रामसभेत ठराव घेण्यात आला आहे.
धारबांदोडा येथील आयडीसीच्या जागेत इथेनॉल प्रकल्प उभारण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. स्थानिक पंचायतीकडे या प्रकल्पाबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. ग्रामसभेत ग्रामस्थांनी इथेनॉल प्रकल्पाला, तसेच हॉटमिक्स प्रकल्पाला विरोध करण्याचा ठराव घेतला आहे. सरपंच या नात्याने मी ग्रामस्थांसोबत राहणार आहे, अशी प्रतिक्रिया सरपंच दामोदर नाईक यांनी व्यक्त केली.
विकासकामांची माहिती देण्यात पंचायत अपयशी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत विविध कार्यक्रमांत प्रत्येक आमदाराला दरवर्षी १०० कोटी रुपये विकासकामासाठी देत असल्याचे भाष्य करतात. त्यामुळे गेल्या चार वर्षांत धारबांदोडा पंचायत क्षेत्रात किती कोटी रुपये खर्च करून विकासकामे करण्यात आली याची माहिती आम्ही पंचायत मंडळाकडे मागितली होती. मात्र पंचायत मंडळाने अद्याप उत्तर दिलेले नाही, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.


