तेरेखोल नदीत उडी मारून आई-मुलाची आत्महत्या

सातार्डा–रायाचेपेड येथे आई आणि मुलाने एकमेकांचे हात दोरीने बांधून तेरेखोल नदीपात्रात उडी घेतल्याची दुर्दैवी घटना रविवारी पहाटे उघडकीस आली. श्रुतिका श्यामसुंदर आरोंदेकर (५५) आणि त्यांचा मुलगा तुकाराम ऊर्फ सुहास श्यामसुंदर आरोंदेकर (२६) अशी मृतांची नावे आहेत.


14 mins ago
तेरेखोल नदीत उडी मारून आई-मुलाची आत्महत्या

तेरेखोल नदीतून मृतदेह बाहेर काढताना नागरिक. सोबत पोलीस आणि इतर.

गोवन वार्ता विशेष प्रतिनिधी
पेडणे
सातार्डा–रायाचेपेड येथे आई आणि मुलाने एकमेकांचे हात दोरीने बांधून तेरेखोल नदीपात्रात उडी घेतल्याची दुर्दैवी घटना रविवारी पहाटे उघडकीस आली. श्रुतिका श्यामसुंदर आरोंदेकर (५५) आणि त्यांचा मुलगा तुकाराम ऊर्फ सुहास श्यामसुंदर आरोंदेकर (२६) अशी मृतांची नावे आहेत.


तुकाराम आरोंदेकर.

घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिसांनी रविवारी सकाळपासून तेरेखोल नदीपात्रात शोधमोहीम सुरू केली. गोवा पोलिसांनीही बोटीच्या साहाय्याने नदीपात्रात शोध घेतला. नदीकिनारी चप्पल आढळून आल्याने शोधकार्य अधिक तीव्र करण्यात आले. स्थानिक ग्रामस्थ शरद राऊळ यांनी दोरीला दगड बांधून नदीपात्रात गळ टाकून शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे माय-लेकाचे मृतदेह त्यांनी नदीत उडी घेतलेल्या ठिकाणीच आढळले. मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले. दोघांचेही हात एकमेकांना बांधलेल्या अवस्थेत असल्याचे समोर आले.
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी सावंतवाडी येथील शासकीय रुग्णालयात पाठविले. मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास सावंतवाडी पोलीस करीत आहेत. घटनास्थळी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, सातार्डा बिट अंमलदार टाकेकर, पोलीस पाटील विनिता मयेकर आणि सातोसेचे पोलीस पाटील संदीप सातार्डेकर उपस्थित होते. जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर, पंचायत समिती सदस्य उदय पारिपत्ये आणि सरपंच संदीप प्रभू हेही घटनास्थळी उपस्थित होते. ग्रामस्थांनी शोध व मदतकार्यात सहकार्य केले.
आज अंत्यसंस्कार
मिळालेल्या माहितीनुसार, मृतदेह सध्या सावंतवाडी येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आले आहेत. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात येणार असून, सोमवारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. आई आणि मुलाच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे रायाचेपेडसह परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.      

हेही वाचा
सर्व पहा