वीजमंत्री सुदिन ढवळीकरांवर विरोधकांचा चौफेर हल्ला!

मगोपचे नेते सुदिन ढवळीकर यांनी इतर पक्षांना निष्ठावंतांना उमेदवारी देण्याचा सल्ला देण्यापूर्वी, स्वतःच्या मडकई मतदारसंघात राजेश कवळेकर किंवा अनंत नाईक यांच्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी, अशी मागणी विरोधी आमदार आणि नेत्यांनी केली आहे. निष्ठावंतांना उमेदवारी देण्याच्या ढवळीकर यांच्या विधानाचा समाचार घेत विविध पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.


6 mins ago
वीजमंत्री सुदिन ढवळीकरांवर विरोधकांचा चौफेर हल्ला!

गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी
मगोपचे नेते सुदिन ढवळीकर यांनी इतर पक्षांना निष्ठावंतांना उमेदवारी देण्याचा सल्ला देण्यापूर्वी, स्वतःच्या मडकई मतदारसंघात राजेश कवळेकर किंवा अनंत नाईक यांच्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी, अशी मागणी विरोधी आमदार आणि नेत्यांनी केली आहे. निष्ठावंतांना उमेदवारी देण्याच्या ढवळीकर यांच्या विधानाचा समाचार घेत विविध पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
विधानसभा निवडणूक जवळ आल्याने राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नुकतेच सुदिन ढवळीकर यांनी, राजकारण शुद्ध करण्यासाठी राजकीय पक्षांनी इतर पक्षांतून आलेल्या नेत्यांपेक्षा २०-२० वर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली पाहिजे, असे मत मांडले होते. मी सुरुवातीपासून मगोपमध्येच आहे, इतर पक्षात गेलो नाही म्हणूनच कदाचित मुख्यमंत्री होऊ शकलो नाही, असेही ते म्हणाले होते. याशिवाय, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचे सुपुत्र सिद्धेश नाईक हे अनेक वर्षे भाजपमध्ये कार्यरत असल्याने भाजपने त्यांना उमेदवारी द्यावी, असा सल्लाही ढवळीकर यांनी दिला होता.
मडकईवरून आमदार गोविंद गावडे यांची टीका
ढवळीकर यांच्या या सल्ल्यावर प्रियोळचे आमदार गोविंद गावडे यांनी थेट मडकई मतदारसंघाचा मुद्दा उपस्थित करत टीका केली. मगोपमध्ये राजेश कवळेकर यांच्यासारखे अनेक निष्ठावान कार्यकर्ते अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. आगामी निवडणुकीत मगोपने मडकईतून कवळेकर यांना उमेदवारी द्यावी. मडकईत अनेक पंच आणि सरपंच मगोपचे काम करत आहेत, त्यापैकी कोणालातरी आमदार होण्याची संधी सुदिन ढवळीकर यांनी दिली पाहिजे. इतरांना सल्ला देण्यापूर्वी त्यांनी स्वतः हा नियम पाळावा, असे गावडे म्हणाले.

आमदार राजेश फळदेसाई यांची तिखट प्रतिक्रिया
कुंभारजुवेचे भाजप आमदार राजेश फळदेसाई यांनी सुदिन ढवळीकर यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली. सुदिन ढवळीकर हे सरकारमधील ‘झोपा काढणारे’ मंत्री आहेत. वयोमानामुळे ते काय बोलतात, याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज नाही. पक्षाने कोणाला उमेदवारी द्यायची, हे भाजप स्वतः ठरवेल. ढवळीकर यांनी त्याची चिंता करू नये, असा टोला फळदेसाई यांनी लगावला.


काँग्रेस नेते वेरेकर यांचा ‘घराणेशाही’चा आरोप
फोंड्याचे काँग्रेसचे नेते आणि २०२२ मधील उमेदवार राजेश वेरेकर यांनीही वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्यावर घराणेशाहीचा आरोप केला. मगोपमध्ये राजेश कवळेकर, अनंत नाईक यांच्यासारखे निष्ठावंत आहेत. त्यांच्यासाठी सुदिन ढवळीकर मडकई मतदारसंघ सोडणार असतील, तर ती चांगली गोष्ट आहे. परंतु, जर ते आपले सुपुत्र मिथील ढवळीकर यांच्यासाठी मडकई सोडून स्वतः फोंड्यातून निवडणूक लढवणार असतील, तर ही निव्वळ घराणेशाही आहे. अशा परिस्थितीत फोंड्याचे मतदार योग्य तो निर्णय घेतील, असे वेरेकर यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा
सर्व पहा