कचरा व्यवस्थापनसाठी ताळगाव पंचायतीने वेगाने पावले उचलली : सरपंच मारिया फर्नांडिस

ताळगाव ग्रामसभेत खाडी आणि परिसरातील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि विकासकामांवर चर्चा झाली. सरपंच मारिया यांनी पंचायत प्रशासनाचे कार्य उत्तम असल्याचे स्पष्ट करत विकासावर टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
1 hours ago
कचरा व्यवस्थापनसाठी ताळगाव पंचायतीने वेगाने पावले उचलली : सरपंच मारिया फर्नांडिस

पणजी : रविवारी सकाळच्या सत्रात पार पडलेल्या ताळगाव ग्रामसभेत खाडी आणि आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता, गावातील कचरा व्यवस्थापन आणि विविध विकासकामांवर चर्चा झाली. ग्रामसभेनंतर सरपंच मारिया आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ग्रामसभेत उपस्थित झालेले विविध मुद्दे आणि प्रशासनाकडून प्रत्यक्ष सुरू असलेल्या विकासकार्यांची पत्रकारांना सविस्तर माहिती दिली.

 सध्या गावात पर्यटकांच्या वावरामुळे आणि इतर कारणांमुळे प्लास्टिक कचऱ्याची काही प्रमाणात समस्या निर्माण होत असली, तरी त्यावर अतिशय प्रभावीपणे नियंत्रण मिळवले जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले. खाडी परिसरात कितीही स्वच्छता केली तरी लोक कचरा टाकतातच. स्मार्ट सिटी प्रशासन आणि पालिकेचे महापौर रोहित मोन्सेरात यांच्या पुढाकाराने एका खासगी एजन्सीमार्फत हा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्याचे काम सध्या अत्यंत वेगात सुरू आहे. केवळ पब्लिसिटी किंवा निवडणुकीच्या प्रचारापुरते नव्हे, तर खऱ्या अर्थाने ग्राउंड लेव्हलवर सातत्याने स्वच्छतेचे काम सुरू असल्याचे सरपंचांनी स्पष्ट केले.

आमदार बाबुश मोन्सेरात जेव्हा कधी परिसरात फेरफटका मारतात, तेव्हा त्यांना कुठेही त्रुटी किंवा समस्या आढळल्यास ते त्वरित फोन करून सरपंच व संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देतात आणि अवघ्या काही वेळातच कामगार पाठवून ती समस्या तात्काळ सोडवली जाते. ताळगावला हिरवे, सुंदर आणि स्वच्छ ठेवण्यासाठी ते स्वतः जातीने लक्ष घालून कठोर मेहनत घेत आहेत. तसेच तळगाव बाजारपेठेत होणारी वाढती गर्दी आणि वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पोलीस ड्राईव्ह आणि इतर विशेष पावले उचलण्यात येत आहेत. धेंपो कॉलेज आणि इतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहकार्याने बीच क्लीन ड्राईव्ह यांसारखे पर्यावरणपूरक उपक्रम राबवले जात असून, आगामी काळात मार्केट एरियातही अशाच स्वरूपाच्या मोहिमा राबवण्याचे नियोजन आहे. याशिवाय, गटारांचे नूतनीकरण आणि इतर प्रलंबित विकासकामेही सध्या प्रक्रियेत असून त्यांच्या वर्क ऑर्डर आधीच पूर्ण झाल्या आहेत.

ग्रामसभेत काही नागरिकांकडून विकासकामांच्या अनुषंगाने "कामे होत नाहीत" अशी टीका करण्यात आली होती, त्यावर पंचायत मंडळाने आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. पंचायत, सरपंच, उपसरपंच आणि सर्व पंच सदस्य अहोरात्र मेहनत करून ताळगाव स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी कटिबद्ध आहेत. अशा वेळी आम्ही काहीच करत नाही असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे असून, ताळगावकरांना लाभलेले खमके नेतृत्व पाहता ग्रामस्थांनी या सर्व विकासाबद्दल सार्थ गर्व बाळगला पाहिजे, असे सरपंच मारिया यावेळी म्हणाल्या.



हेही वाचा
सर्व पहा