फोंडा : कुर्टी येथील सहकार भवनाच्या सभागृहात पार पडलेली गोवा डेअरीची वार्षिक सर्वसाधारण सभा दूध उत्पादकांच्या तीव्र आक्षेपानंतर तहकूब करण्यात आली. सभेची नोटीस बेकायदेशीर असल्याचा आरोप करत दूध उत्पादकांनी ही सभा उधळून लावली. तहकूब झालेली ही सभा नियमानुसार लवकरात लवकर पुन्हा आयोजित करण्यात यावी, अशी मागणी यावेळी दूध उत्पादकांनी केली.
सदर सभा शनिवारी सकाळी १० वाजता सुरू झाली होती. या सभेला सरकारने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष पराग नगर्सेकर, सदस्य रामा परब, व्यवस्थापकीय संचालक नवीन कुमार यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सभेच्या सुरूवातीलाच दूध उत्पादकांनी नोटिशीच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित केले. सहकार कायद्यानुसार सहकार निबंधकांनी नोटीस काढणे आवश्यक असताना, व्यवस्थापकीय संचालकांनी स्वाक्षरी करून नोटीस पाठवल्याने ती बेकायदेशीर ठरते, असा आक्षेप घेण्यात आला.
अधिक माहिती देताना दुर्गेश शिरोडकर म्हणाले, सरकारने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीकडून गोवा डेअरीचा कारभार व्यवस्थित चालवला जात नाही. सहकार निबंधकांऐवजी व्यवस्थापकीय संचालक नोटीस पाठवून बेकायदेशीर कामे करत आहेत. या प्रकाराकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
दुसरे दूध उत्पादक रमेश नाईक यांनी गोवा डेअरीच्या सद्यस्थितीवर चिंता व्यक्त करताना सांगितले, गोवा डेअरीची वाटचाल बंद पडलेल्या संजीवनी साखर कारखान्याच्या दिशेने सुरू आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेत मराठी ऐवजी इंग्रजी भाषेचा वापर करू नये, असा स्पष्ट ठराव असतानाही अधिकारी वर्ग इंग्रजीतून व्यवहार करत आहेत.
मराठीतून कामकाज करण्याची मागणी
सभेत इतिवृत्तांत वाचनाला सुरुवात झाल्यानंतर दूध उत्पादकांनी ते मराठीत वाचून दाखवण्याची विनंती केली. भाषेचा वाद आणि नोटिशीतील बेकायदेशीरपणा या दोन्ही मुद्द्यांवरून वातावरण तापल्याने अखेर सभा तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सभा तहकूब झाल्यानंतर प्रशासकीय समितीचे अध्यक्ष पराग नगर्सेकर यांनी सांगितले की, दूध उत्पादकांच्या मागणीचा आदर करून पुढील सर्व प्रक्रिया मराठी भाषेत केली जाईल. नियमानुसार प्रक्रिया पूर्ण करून लवकरच तहकूब झालेली वार्षिक सर्वसाधारण सभा पुन्हा बोलावली जाईल.


