पणजी: गोव्यातील विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी आयआयटी सारख्या संस्था आवश्यक आहेत. मात्र काहीजण आयआयटीला केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी विरोध करत आहेत. यामध्ये स्वतः अभियंता असणारे देखील आहेत याचे वाईट वाटते. या विरोधामुळे गोव्याच्या भविष्यावर परिणाम होत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी केले. शनिवारी पणजीत गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शास्त्रज्ञ डॉ अनिल काकोडकर यांच्यासह महाविद्यालयाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, गोव्याची पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला. यामुळे गोव्यातील हजारो विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे. यातील अनेक जण आज मोठ्या पदावर आहेत. त्यावेळी भाऊसाहेबांनी भविष्याचा विचार करूनच महाविद्यालय उभे केले होते. आज आम्ही हाच विचार करून आयआयटी गोव्यात आणण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र काही लोक त्याला विरोध करतात. यामध्ये काहींचा जमिनीचा स्वार्थ आहे, तर काही जणांना केवळ विरोध करण्यासाठी उभे केले आहे. मात्र, या लोकांमुळे गोव्यातील विद्यार्थी मोठ्या संधीला मुकत आहेत.
ते म्हणाले, गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय हे खऱ्या अर्थाने गोव्यातील अभियंते घडवणारी भूमी आहे. आयआयटी, एनआयआयटीची सुरुवात देखील इथूनच झाली. या महाविद्यालयाने पुढील २५ वर्षांचा विचार करणे आवश्यक आहे. भविष्यात आपल्याला कोणत्या साधन सुविधा, पायाभूत सुविधा लागणार आहेत याचा आताच विचार करावा. याबाबतचे प्रस्ताव राज्य सरकारला द्यावेत. पुढील एका वर्षात अधिकाधिक प्रस्ताव मंजूर केले जातील. शिक्षण मंत्री या नात्याने माझ्या कार्यकाळात अनेक नवीन बदल करण्यात आले आहेत. पणजीतील पाच महाविद्यालयांना एकाच जागेवर नेण्याचा आमचा विचार आहे. यासाठी सुमारे १ हजार कोटी रुपये खर्च केला जाणार आहे.
तत्पूर्वी झाल्या भाषणात अनिल काकोडकर म्हणाले की, देशाच्या विकासात शिक्षण संस्थांची भूमिका महत्त्वाची आहे. देशामध्ये संपत्ती निर्माण करणे, लोकांमध्ये हॅपिनेस इंडेक्स वाढवणे यासाठी चांगले विद्यार्थी निर्माण होणे गरजेचे आहे. आजच्या काळात विद्यार्थ्यांनी फॉलोवर बनण्यापेक्षा लीडर बनून समाजाचे नेतृत्व करावे. असे विद्यार्थी घडवण्यामध्ये शिक्षण संस्थांची भूमिका महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांमधील सर्व प्रकारची भीती दूर होऊन त्यांच्यातआत्मविश्वास निर्माण झाल्यास नेतृत्व गुण सहज विकसित होतील. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक युगाची तयारी शिक्षण संस्थांपासून सुरू झाली पाहिजे. स्पर्धेसोबतच त्यांच्यातील माणुसकी देखील जपली पाहिजे .
उज्वला योजनेचा फायदा सर्वांना मिळेल
मुख्यमंत्री म्हणाले की, उज्वला योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या आणि पात्र असणाऱ्या सर्वांना या योजनेचा फायदा मिळणार आहे. सध्या अर्जांची छाननी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याबाबत चुकीची माहिती सांगणाऱ्यांवर विश्वास ठेवू नये.


