गोमेकॉत ९५ कनिष्ठ निवासी डॉक्टरांची भरती; महिन्याला ८० हजार रुपये मानधन, २९ ऑक्टोबरला मुलाखती

गोवा मेडिकल कॉलेजमध्ये ९५ कनिष्ठ निवासी डॉक्टर व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कंत्राटी पदांसाठी २९ ऑक्टोबरला थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या असून निवड झालेल्यांना महिन्याला ८० हजार रुपये मानधन मिळेल. वाचा सविस्तर.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
just now
गोमेकॉत ९५ कनिष्ठ निवासी डॉक्टरांची भरती; महिन्याला ८० हजार रुपये मानधन, २९ ऑक्टोबरला मुलाखती

पणजी: गोवा शासनाच्या आरोग्य सेवा संचालनालय व गोवा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल (गोमेकॉ) अंतर्गत राज्यातील सरकारी आरोग्य संस्थांमध्ये ९५ कनिष्ठ निवासी डॉक्टर तथा वैद्यकीय अधिकारी (ज्युनिअर रेसिडेंट / मेडिकल ऑफिसर) पदांच्या भरतीची घोषणा करण्यात आली आहे. अल्पमुदतीच्या एक वर्षाच्या कार्यकाळासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात असून पात्र एमबीबीएस पदवीधरांसाठी २९ ऑक्टोबर २०२६ रोजी वॉक-इन-कॉन्सिलिंग आणि थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. निवड झालेल्या डॉक्टरांना प्रतिमहिना ८० हजार रुपये ठोक मानधन दिले जाणार आहे.

या भरती योजनेअंतर्गत एकूण २०० मंजूर पदांपैकी ९५ जागा रिक्त असून त्या भरण्यासाठी ही प्रक्रिया पार पडत आहे. अनिवार्य निकषानुसार इंटर्नशिप पूर्ण केलेले आणि राज्य वैद्यकीय परिषद किंवा राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडे (NMC) वैध नोंदणी असलेले एमबीबीएस पदवीधर या मुलाखतीसाठी पात्र ठरणार आहेत. निवड प्रक्रियेत गोवा मेडिकल कॉलेजमधून गेल्या तीन शैक्षणिक वर्षांत (विशेषतः २०२५-२६) एमबीबीएस पूर्ण केलेल्या स्थानिक विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल. गोमेकॉतील उमेदवार उपलब्ध न झाल्यास इतर वैद्यकीय महाविद्यालयांतील उमेदवारांचा विचार केला जाईल.

मुलाखत आणि समुपदेशन प्रक्रिया गुरुवार, २९ ऑक्टोबर २०२६ रोजी बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेजच्या डीन कार्यालयासमोरील सभागृहात पार पडणार आहे. उमेदवारांनी सकाळी ९:३० वाजता मूळ कागदपत्रे आणि छायांकित प्रतींसह नोंदणीसाठी उपस्थित राहणे अनिवार्य आहे. सकाळी १०:०० वाजेनंतर येणाऱ्या उमेदवारांचा कोणत्याही परिस्थितीत मुलाखतीसाठी विचार केला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.

निवड झालेल्या डॉक्टरांची नियुक्ती गुणवत्तेच्या आधारे गोमेकॉ तसेच जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, नागरी व ग्रामीण आरोग्य केंद्रांमध्ये केली जाईल. सहा महिन्यांचा कार्यकाळ गोमेकॉमध्ये आणि सहा महिन्यांचा कार्यकाळ आरोग्य सेवा संचालनालयांतर्गत इतर सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये असेल. एकदा निवडलेले सेवा ठिकाण बदलण्याची सवलत असणार नाही. ही नियुक्ती पूर्णपणे एक वर्षाच्या अल्पमुदती करारावर असून ती नियमित सेवेचा किंवा ज्येष्ठतेचा हक्क प्रदान करत नाही.

मुलाखतीस उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांनी डीन, गोवा मेडिकल कॉलेज यांच्या नावे अर्ज, अपडेटेड बायोडाटा, दोन पासपोर्ट साईज फोटो, एमबीबीएस पदवी किंवा तात्पुरते प्रमाणपत्र, सर्व वर्षांचे गुणपत्रक, इंटर्नशिप पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र, वैद्यकीय परिषदेचे नोंदणी प्रमाणपत्र आणि ओळखीचा पुरावा (उदा. आधार कार्ड किंवा अन्य सरकारी ओळखपत्र) यांचे मूळ संच व स्व-साक्षांकित प्रती सोबत आणणे आवश्यक आहे. उमेदवारांनी सकाळी २९ ऑक्टोबर रोजी, सकाळी ९.३० वाजता कागदपत्रांच्या पडताळणीसाठी उपस्थित राहावे. १० वाजल्यानंतर येणाऱ्यांचा विचार केला जाणार नाही. प्रत्यक्ष समुपदेशन व मुलाखती दुपारी ३ वाजल्यापासून सुरू होतील.