कदंब बसचे अपघात तीन वर्षांत दुपटीने वाढले

मागील काही वर्षांत राज्यात रस्ते अपघातात आणि त्यामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. बहुतेक अपघात खाजगी, व्यावसायिक वाहनांचे होतात. असे असले तरी काही वेळेस कदंब बसच्या अपघातांचीदेखील नोंद होत आहे. तीन आर्थिक वर्षांत कदंब बसच्या अपघातांत दुपटीने वाढ झाली आहे.


23rd October, 11:55 pm
कदंब बसचे अपघात तीन वर्षांत दुपटीने वाढले

गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी
मागील काही वर्षांत राज्यात रस्ते अपघातात आणि त्यामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. बहुतेक अपघात खाजगी, व्यावसायिक वाहनांचे होतात. असे असले तरी काही वेळेस कदंब बसच्या अपघातांचीदेखील नोंद होत आहे. तीन आर्थिक वर्षांत कदंब बसच्या अपघातांत दुपटीने वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये कदंब बसचे ३७ अपघात झाले होते. यामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला होता. २०२५-२६ मध्ये कदंब बसचे ७४ अपघात झाले होते. या अपघातांमध्ये ४ जणांचा मृत्यू झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, २०२१-२२ मध्ये एकूण २८ अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. एकूण अपघातांपैकी एक गंभीर, १३ मोठे तर १४ किरकोळ अपघात होते. २०२२- २३ मध्ये एकूण ३८ अपघातांत ४ जणांचा मृत्यू झाला होता. एकूण अपघातांपैकी ४ गंभीर, २२ मोठे तर १२ किरकोळ अपघात होते. २०२३-२४ मध्ये कदंब बसच्या एकूण अपघातांपैकी ७ गंभीर, तर प्रत्येकी १५ मोठे आणि लहान स्वरूपाचे अपघात होते. २०२४-२५ मध्ये एकूण ४६ अपघातांत ४ जणांचा मृत्यू झाला होता. एकूण अपघातांपैकी ४ गंभीर, २४ मोठे, तर १८ किरकोळ अपघात होते. आर्थिक वर्ष २०२५- २६ मध्ये कदंब बसच्या एकूण अपघातांपैकी २ गंभीर, तर २० मोठे आणि ५२ लहान स्वरूपाचे अपघात होते.


बस बंद पडण्याचे प्रमाणही वाढले
मागील पाच आर्थिक वर्षांत कदंब बस बंद पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. पाच वर्षात एकूण ३,७०८ वेळेस कदंब बस बंद पडल्या होत्या. याचाच अर्थ महिन्याला सरासरी ६१ म्हणजेच दर दिवसाला सरासरी दोन बस बंद पडल्या. वर्षनिहाय पाहता, २०२१-२२ मध्ये ६९५ वेळेला कदंब बस बंद पडल्या होत्या. २०२२-२३ मध्ये ६८९, २०२३-२४ मध्ये ६८२, २०२४-२५ मध्ये ८०८, तर २०२५-२६ मध्ये ८३४ वेळेला कदंब बस बंद पडल्या होत्या.
अपघाताचा दर ०.१६ वरून ०.२९ टक्के
कदंब महामंडळातर्फे प्रत्येक एक लाख किलोमीटर मागे झालेल्या अपघातांचा दर नोंद केला जातो. आर्थिक वर्ष २०२२- २३ मध्ये हा दर ०.१६ टक्के इतका होता. २०२५- २६ मध्ये तो वाढून ०.२९ टक्के झाला. तसेच २०२२- २३ मध्ये प्रत्येक १० हजार किलोमीटरला कदंब बस बंद पडण्याचा दर ०.२९ टक्के होता. २०२५- २६ मध्ये हा दर वाढून ०.३३ टक्के झाला.

हेही वाचा
सर्व पहा