पणजी: अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा तसेच विविध वातावरणीय कारणांमुळे शुक्रवारी राज्यात जोरदार पावसाची नोंद झाली. दुपारनंतर पावसाला सुरुवात झाली आणि काही ठिकाणी पडझडीच्या घटनांची नोंद झाली, तर काही ठिकाणी पाणी साचून राहिले. अचानक आलेल्या या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून हवामान खात्याने पुढील दोन दिवस विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
राजधानी पणजीमध्ये सकाळी ढगाळ वातावरण होते आणि दुपारी काही काळ कडक ऊन पडले होते. त्यानंतर दुपारी साडेतीन नंतर पावसाला सुरुवात झाली. सततच्या पावसामुळे मळा, पाटो व अन्य परिसरातील काही रस्त्यांवर पाणी भरले होते. संध्याकाळी उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता, ज्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक संथ गतीने सुरू होती.
गेल्या चोवीस तासांत पणजीत कमाल ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, आगामी २९ ऑक्टोबरपर्यंत राज्यातील कमाल तापमान ३३ ते ३५ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. याशिवाय मुरगावमध्ये ३५.५ अंश सेल्सिअस कमाल तर २५.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली, तर पणजीतील किमान तापमान २६.२ अंश सेल्सिअस राहिले. पुढील सहा दिवस राज्यातील किमान तापमान २४ ते २६ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता असून, आगामी २६ ते २९ ऑक्टोबर दरम्यान राज्यातील वातावरण पुन्हा कोरडे राहण्याची शक्यता खात्याने व्यक्त केली आहे.


