मिकीची बाणावलीतून निवडणूक लढण्याची घोषणा

युजीडीपी तिकीटावर रिंगणात उतरणार; माजी पर्यटनमंत्री फ्रान्सिस्को झेवियर पाशेको उर्फ मिकी यांनी आगामी २०२७ मध्ये होणारी विधानसभा निवडणूक बाणावली मतदारसंघातून लढविण्याची घोषणा केली आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
just now
मिकीची बाणावलीतून निवडणूक लढण्याची घोषणा

मडगाव : माजी पर्यटनमंत्री फ्रान्सिस्को झेवियर पाशेको उर्फ मिकी यांनी आगामी २०२७ मध्ये होणारी विधानसभा निवडणूक बाणावली मतदारसंघातून लढविण्याची घोषणा केली आहे. युनायटेड गोअन्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या (यूजीडीपी) (United Goans Democratic Party (UGDP)) तिकिटावर निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले.

बाणावली हा आपला राजकीय प्रवास सुरू झालेला मतदारसंघ असून, येथील जनतेने यापूर्वी सलग तीनवेळा निवडून देऊन सेवेची संधी दिली होती. जनतेचा विश्वास आणि पाठिंबा पुन्हा मिळवून नव्या वचनबद्धतेने मतदारसंघाची सेवा करण्यासाठी आपण परतत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यापूर्वी नुवे मतदारसंघातून राजकीय वाटचाल सुरू ठेवली असली, तरी बाणावलीतील राजकीय घडामोडी आणि नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष कायम होते. बाणावलीचा अपेक्षित विकास झालेला नसून, नागरिकांना खंबीर आणि सहज उपलब्ध होणार्‍या नेतृत्वाची गरज आहे. स्थानिकांकडून मिळालेला पाठिंबा आणि निवडणूक लढविण्याचा आग्रह यामुळे बाणावली मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

  बाणावलीतील सध्याच्या नेतृत्वावर टीका करताना मिकी यांनी तेथील जनतेने नेतृत्वाची अहंकारी वृत्ती आणि त्याचे परिणाम अनुभवले असल्याचा दावा केला. आगामी निवडणुकीत मतदारांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावा, असे आवाहन केलेे. बाणावलीतील पायाभूत सुविधा आणि रस्त्यांची स्थिती सुधारणे, स्थानिक रोजगाराच्या संधी वाढविणे तसेच मतदारसंघाची संस्कृती, पर्यावरण आणि ऐतिहासिक वारसा जपत जबाबदार विकास साधणे, या कामांना प्राधान्यक्रम देणार असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा
सर्व पहा