पणजी : मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून शिरदोण येथील एका ६५ वर्षीय व्यक्तीची २ कोटी ३० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या ब्रिजेश गोवेकर याच्याविरोधात गोवा पोलिसांच्या (Goa Police) आर्थिक गुन्हे कक्षाने (Economic offense cell) गुन्हा दाखल केला आहे. गोवेकर हे दिवाडीतील सातारभाट येथील रहिवासी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ६५ वर्षीय व्यक्तीला ट्रेडिंगमधील गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले. या आमिषाला बळी पडून त्यांनी कथितरीत्या २ कोटी ३० लाख रुपयांची रक्कम गुंतवली. मात्र, या गुंतवणुकीच्या माध्यमातून त्यांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणाची दखल घेत गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे कक्षाने ब्रिजेश गोवेकर याच्याविरोधात प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवला आहे. या प्रकरणात नेमकी किती रक्कम कोणत्या माध्यमातून हस्तांतरित करण्यात आली, तसेच कथित फसवणुकीत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबतची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.


