देवगड : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड ते वेंगुर्ला दरम्यानच्या सागरी किनारपट्टीवर सध्या मासेमारी करणाऱ्या ट्रॉलर्सवर भरसमुद्रात दरोडे टाकण्याचे गंभीर आणि थरारक प्रकार उघडकीस आले आहेत. हॉलीवूडच्या ‘पायरेट्स ऑफ द कॅरिबियन’ चित्रपटातील प्रसंगांप्रमाणे काही अज्ञात छोट्या नौकाधारकांकडून ट्रॉलर्सना घेराव घालून संघटितपणे मासळी लुटली जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिक मच्छीमारांनी केला आहे. या लुटीचा एक व्हिडिओ समोर आल्यानंतर संपूर्ण कोकणातील मच्छीमार क्षेत्रात तीव्र संतापाची लाट पसरली असून, यामुळे सागरी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॉलर व्यावसायिक जेव्हा आपल्या कायदेशीर सागरी क्षेत्रात मासेमारी करत असतात, त्यावेळी चार ते पाच छोट्या नौका अचानक तिथे येतात. या नौका ट्रॉलर्सना चारही बाजूंनी वेढा घालून दबाव आणतात आणि जबदस्तीने मासळी पळवून नेतात. विशेष म्हणजे, या लुटीसाठी वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही लहान नौकेवर नाव अथवा मत्स्य व्यवसाय विभागाचा अधिकृत नोंदणी क्रमांक लिहिलेला नसतो. ओळख लपवून केल्या जाणाऱ्या या कारवायांमुळे दरोडेखोरांची ओळख पटवणे मच्छीमारांना कठीण जात आहे. पूर्वी या प्रकारांबाबत थेट पोलीस तक्रारी होत नसल्याचा गैरफायदा घेत अशा समाजकंटकांचे धाडस वाढले असून, गेल्या काही दिवसांत या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे.
या वाढत्या गुन्हेगारीमुळे मच्छीमार बांधवांना दुहेरी आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. एकीकडे कष्टाने मिळवलेली मासळी लुटली जात आहे, तर दुसरीकडे पळवापळवीच्या गडबडीत लाखो रुपयांची महागडी जाळी फाटून मोठे नुकसान होत आहे. यामुळे स्थानिक मच्छीमारांच्या रोजगारावर आणि प्रत्यक्ष जिवाच्या सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
या वाढत्या गैरप्रकाराचा तातडीने बंदोबस्त करावा, या प्रमुख मागणीसाठी संतप्त ट्रॉलर मच्छीमारांच्या शिष्टमंडळाने देवगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन त्यांना अधिकृत निवेदन सादर केले. या निवेदनात मच्छीमारांनी लुटीमध्ये थेट सहभाग असल्याचा आरोप असलेल्या १३ संशयित व्यक्तींची नावे आणि या लुटलेल्या बेकायदेशीर मासळीची खरेदी करणाऱ्या मालवण येथील ५ व्यापाऱ्यांची नावे पोलिसांकडे सोपवली आहेत.
या शिष्टमंडळात सहदेव बापर्डेकर, द्विजकांत कोयंडे, निवृत्ती तारी, गोपीनाथ तांडेल, इतियास होलसेकर, अशोक सारंग, अनिश कोयंडे, प्रणव पारकर आणि रिहान शेख यांच्यासह अनेक मच्छीमार प्रतिनिधी उपस्थित होते. सागरी सुरक्षा यंत्रणा आणि सागरी पोलिसांनी याप्रकरणी तात्काळ आणि कठोर कारवाई करावी, अशी आग्रही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


