नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी (BJPs Senior Leader Lal Krishna Advani) यांना छातीच्या संसर्गामुळे दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ९८ वर्षीय अडवाणी यांची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांच्या पथकाच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
शुक्रवारी सायंकाळी सुमारे ७.३० वाजता अडवाणी यांना रुग्णालयात आणण्यात आले. त्यानंतर त्यांना फुफ्फुसविकार विभागात दाखल करण्यात आले. सध्या त्यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. विविध वैद्यकीय तपासण्या सुरू आहेत.
वाढत्या वयाशी संबंधित आरोग्यविषयक समस्यांमुळे अडवाणी यांना यापूर्वीही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यंदाच्या मे महिन्यात त्यांच्यावर अपोलो रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्यावेळी काही दिवस वैद्यकीय देखरेखीखाली ठेवल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते.
डिसेंबर २०२४ मध्येही त्यांना इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल करण्यात आले होते. त्यावेळी न्यूरोलॉजिस्टच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
भाजपच्या वाटचालीत महत्त्वाचे योगदान
८ नोव्हेंबर १९२७ रोजी तत्कालीन ब्रिटिश भारतातील कराची येथे जन्मलेले लालकृष्ण अडवाणी हे भाजपच्या इतिहासातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्यात आणि राष्ट्रीय राजकारणात भाजपला महत्त्वाचे स्थान मिळवून देण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली.
‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानीत
१९९० मध्ये त्यांनी काढलेली राम रथयात्रा भारतीय राजकारणातील महत्त्वाचा टप्पा ठरली. अडवाणी यांनी अनेक वेळा भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमध्ये त्यांनी २००२ ते २००४ या काळात उपपंतप्रधान म्हणून काम पाहिले. याशिवाय त्यांनी केंद्रीय गृहमंत्रिपदासह अनेक महत्त्वाची पदे भूषवली.
सार्वजनिक जीवनातील योगदानाबद्दल अडवाणी यांना २०१५ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर २०२४ मध्ये त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला ‘भारतरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.


