जंतरमंतरवर घुसखोरी पडली महागात; आशुतोष-सौरभ यांना अटक, पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी!

दिल्लीतील जंतरमंतर येथे अनधिकृतपणे प्रवेश करून पोलिसांच्या कर्तव्यात अडथळा आणल्याप्रकरणी कॉक्रोच जनता पार्टीच्या १४ सदस्यांवर दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून, दोघांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
49 mins ago
जंतरमंतरवर घुसखोरी पडली महागात; आशुतोष-सौरभ यांना अटक, पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी!

नवी दिल्ली : दिल्लीतील जंतरमंतर परिसरात निदर्शनांच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. आंदोलनासाठी प्रतिबंधित (डिनोटिफाय) करण्यात आलेल्या जंतरमंतर परिसरात अनधिकृतपणे प्रवेश केल्याप्रकरणी आणि शासकीय कर्तव्यात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या (CJP) तब्बल १४ सदस्यांविरोधात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईदरम्यान पक्षाचे प्रमुख नेते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना अटक करण्यात आली असून, त्यांना ५ दिवसांच्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या त्यांना तिहार तुरुंगात पाठवण्यात आले आहे, तर त्यांचा सहकारी अजिंक्य शिंदे याला शांतता आणि सुव्यवस्था राखण्याच्या अटीवर सोडून देण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार, ही घटना १३ ऑक्टोबर रोजी घडली. कॉक्रोच जनता पार्टीचे हे १४ सदस्य सकाळी अचानक जंतरमंतर परिसरात पोहोचले होते. मुख्य म्हणजे, त्यांनी थेट प्रवेश न करता एका खाजगी जागेतून या परिसरात अनधिकृतपणे प्रवेश केला होता. सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता, आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कार्यकर्त्यांनी शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या अधिकृत कर्तव्यात जाणीवपूर्वक अडथळा निर्माण केला. वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, हे कार्यकर्ते मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत घोषणाबाजी करत होते आणि त्यांनी सुरक्षेचे सर्व बॅरिकेट्स तोडून आत प्रवेश केला होता.

याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या वतीने १३ ऑक्टोबर रोजी दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कॅनॉट प्लेस पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला, तर संसद मार्ग पोलीस ठाण्यातही गंभीर कलमांखाली कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या कलमांमध्ये अनधिकृत प्रवेश, सरकारी अधिकाऱ्याच्या कामात अडथळा आणणे, प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन करणे आणि बेकायदेशीर जमाव जमवणे यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. जंतरमंतर परिसर आता निदर्शनांसाठी अधिकृत मानला जात नसतानाही झालेल्या या प्रकारामुळे प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा
सर्व पहा