म्हापसा : कळंगुट येथील मार्केट (Calangute Market) परिसरात बांधकाम सुरू असलेल्या गटारात पडून गंभीर जखमी झालेल्या मणिपुरी युवकाचा मृत्यू झाला. गटारावर असलेली लोखंडी सळी पोटात घुसल्याने हा युवक गंभीर जखमी झाला होता. काल रात्री ही दुर्घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, कळंगुट मार्केट परिसरात गटाराचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात आल्या नसल्याने पायी चालणारा हा युवक गटारात पडला. यावेळी गटारातील लोखंडी सळी त्याच्या पोटात घुसल्याने तो गंभीर जखमी झाला.
त्याला उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले; मात्र त्याचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे बांधकामाच्या ठिकाणी पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या (जीएसआयडीसी) (Goa State Infrastructure Development Corporation Limited (GSIDC)) कंत्राटदाराने बांधकामस्थळी आवश्यक सुरक्षा व्यवस्था केली नसल्याचा आरोप होत आहे.
बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी योग्य अडथळे, सूचना फलक आणि सुरक्षित पादचारी मार्गाची व्यवस्था असणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष झाल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे संबंधित कंत्राटदाराच्या निष्काळजीपणाबाबत प्रश्न उपस्थित होत असून, अशा बांधकामस्थळी नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.


