बापरे! ऐकावे ते नवलंच, चक्क एका रोबोटने केले अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन

जर्मनीच्या कोलोन शहरात एका फास्ट-फूड रेस्टॉरंटबाहेर १६ वर्षीय मुलीसोबत रोबोटने गैरवर्तन केल्याची अजब घटना समोर आली असून, पोलिसांनी रोबोट आणि तो ऑपरेट करणाऱ्या संशयितांचे मोबाईल जप्त केले आहेत.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
14 mins ago
बापरे! ऐकावे ते नवलंच, चक्क एका रोबोटने केले अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन

म्युनिख : जर्मनीतून एक अत्यंत धक्कादायक आणि अजब घटना घटना घडली असून, एका १६ वर्षीय मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी चक्क एका रोबोटला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. जर्मनीच्या कोलोन शहरातील मध्यवर्ती भागातील होहेनझोलर्नरिंग या अत्यंत गजबजलेल्या रस्त्यावर एका फास्ट-फूड रेस्टॉरंटबाहेर ही घटना घडली.

एक मुलगी रविवारी रात्री तिच्या मैत्रिणींसोबत रेस्टॉरंटच्या बाहेर उभी असताना, अचानक सुमारे १.२ मीटर उंचीचा एक लाल-सोनेरी रंगाचा रोबोट तिच्या पाठीमागून आला. त्याने त्या मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला आणि तिच्या दिशेने काही आक्षेपार्ह हालचाली केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

या संपूर्ण प्रकरणातील सर्वात संतापजनक बाब म्हणजे, दोन किशोरवयीन मुलांनी या घृणास्पद प्रकाराचे मोबाईलद्वारे सोशल मीडियावर थेट प्रक्षेपण अर्थात लाईव्ह स्ट्रीमिंग केले होते. ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी अत्यंत वेगाने पावले उचलत तातडीने शोधमोहीम राबवली. पोलीस अधिकाऱ्यांनी परिसराची कसून तपासणी केली असता, मॅग्नसस्ट्रासे आणि होहेनझोलर्नरिंगच्या जंक्शनजवळ एका फॉक्सवॅगन कारच्या डिकीमध्ये हा रोबोट लपवून ठेवलेला त्यांना आढळून आला. 

पोलिसांनी कायदेशीर कारवाई करत तो रोबोट आणि संबंधित तरुणांचे दोन मोबाईल फोन जप्त केले आहेत. तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्सचा दुरुपयोग करून अशा प्रकारे महिलांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण केल्याबद्दल सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात असून, जर्मनी पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत.

हेही वाचा
सर्व पहा