पणजी : पणजी शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीबाबत गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने (High court of bombay at Goa) चिंता व्यक्त केली आहे. शहरातील वाहतूक कोंडीच्या प्रमुख कारणांमध्ये मांडवीतील कॅसिनोंही (Casino Mandovi River) जबाबदार असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. दयानंद बांदोडकर मार्ग आणि महात्मा गांधी मार्गावरील (एम.जी. रोड) वाहतुकीची स्थिती लक्षात घेऊन न्यायालयाने वाहतूक व्यवस्थेत तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहेत.
पणजीतील प्रमुख रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी, बेशिस्त पार्किंग आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न यांवर न्यायालयाने विशेष लक्ष वेधले. शहरातील महत्त्वाच्या मार्गांवर वाहतुकीचा खोळंबा होत असल्याने वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्यांवर तातडीने उपाययोजना करून वाहतूक सुरळीत करण्याची गरज न्यायालयाने अधोरेखित केली.
बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीला अडथळे : न्यायालय
दयानंद बांदोडकर मार्ग आणि एम.जी. रोड हे पणजीतील महत्त्वाचे रस्ते आहेत. या मार्गांवरील वाहतुकीचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होण्याबरोबरच पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण होऊ शकतो.
या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी कमी करणे, पार्किंग व्यवस्थेवर नियंत्रण ठेवणे आणि पादचाऱ्यांसाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देणे यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता न्यायालयाने व्यक्त केली. पणजीतील वाहतूक व्यवस्थेतील त्रुटी दूर करून शहरातील प्रमुख रस्त्यांवर सुरक्षित आणि सुरळीत वाहतूक सुनिश्चित करण्याचे आव्हान आता प्रशासनासमोर आहे.
न्यायालयाकडून स्वेच्छा दखल
सांता मोनिका जेटीवर प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे व प्रवाशांची फसवणूक होत असल्याचे नजरेस आले होते. त्यावर आळा घालण्यासाठी, गैरसोय रोखण्यासाठी आयुषी क्रुझ प्रा. लि. यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने पणजी शहराची पाहणी केली. त्यावेळी शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचे नजरेस आले. याची दखल घेऊन वाहतूक कोंडी तसेच त्यामुळे नागरिकांना होणारे त्रास व परिसरातील इतर साधन सुविधांवर उपाय काढण्यासाठी न्यायालयाने स्वेच्छा दखल घेऊन सरकारला अनेक निर्देश जारी केले. या प्रकरणी न्यायालयाला मदत करण्यासाठी अॅड. नाईजल डा कोस्टा फ्रेझ यांची अॅमिकस क्युरी म्हणून नियुक्ती केली.


