पणजी : मागील काही दिवसांत राज्यात (Goa) उन्हाचा तडाखा वाढत आहे. कमाल तापमानात वाढ होत आहे. २४ तासात पणजीत (Panjim) कमाल ३६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हे मागील ६२ वर्षांतील ऑक्टोबर महिन्यातील चौथे सर्वाधिक तापमान ठरले आहे. मुरगावमधील कमाल तापमान ३६.४ अंश सेल्सिअस राहिले. १९ ऑक्टोबर पर्यंत राज्यातील कमाल तापमान ३३ ते ३६ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील आठवडाभर उकाडा असणार आहे. (Heat intensity rises; what precautions should be taken?)
मंगळवारी पणजीमध्ये २३.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. मुरगाव मधील किमान तापमान २३.८ अंश सेल्सिअस राहिले. पुढील सहा दिवस राज्यातील किमान तापमान २५ ते २६ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. १३ ते १५ ऑक्टोबर दरम्यान राज्यातील वातावरण उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता आहे. यानुसार या तीन दिवसांसाठी उष्णेताचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
उष्माघातापासून वाचण्यासाठी खबरदारी घ्यावी : हवामान खाते
मंगळवारी पणजीतील जाणवणारे तापमान ४० अंश सेल्सिअस पेक्षा अधिक होते. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार १६ ते १९ ऑक्टोबर दरम्यान राज्यात किरकोळ पावसाची शक्यता आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने (Meteorological Department) नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. उष्माघातापासून वाचण्यासाठी सुती कपडे वापरणे, उन्हापासून डोक्याचे संरक्षण करणे, घराची दारे , खिडक्या उघडे ठेऊन हवा खेळती राहील याची काळजी घेणे, सतत पाणी पित राहणे अशा सूचना खात्याने केल्या आहेत.


