गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी
हडफडे येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन’ नाईट क्लबमध्ये ६ डिसेंबर २०२५ रोजी घडलेल्या भीषण आग दुर्घटनेतील २५ मृतांच्या कुटुंबियांना २० लाख रुपयांची अंतरिम नुकसानभरपाई न्यायालयात जमा करण्याबाबत पुढील सुनावणी वेळी चर्चा होईल, अशी सूचना गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने क्लबच्या मालकांना दिली. या प्रकरणाची पुढील सुनावणी २१ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
हडफडे येथील बर्च क्लबला ६ डिसेंबर रोजी लागलेल्या भीषण आगीत २५ जणांचा मृत्यू, तर सहा जण जखमी झाले होते. या दुर्घटनेची उच्च न्यायालयाने स्वेच्छा दखल घेऊन प्रथम अॅड. रोहित ब्राझ डिसा यांची आणि नंतर अॅड. तेरेन्स सिक्वेरा यांची अॅमिकस क्युरी म्हणून नियुक्ती केली. न्यायालयाने किनारी भागातील काही पंचायती व इतर यंत्रणांना प्रतिवादी करून नोटीस जारी केली होती. त्यात किती जणांना व्यावसायिक परवाना व ‘ना हरकत’ दाखला जारी केला त्याची माहिती देण्यास सांगितले होते. दुर्घटनेत मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांना नुकसानभरपाई मिळावी यावर न्यायालयाने भर दिला होता.
५० लाख रुपये भरपाईची कुटुंबियांची मागणी
मागील सुनावणी वेळी क्लबचे मालक सौरभ लुथरा, गौरव लुथरा आणि व्यावसायिक भागीदार अजय गुप्ता यांनी मृत्यू पावलेल्या २५ जणांना १५ लाख रुपये देण्याचा प्रस्ताव न्यायालयात सादर केला होता. या प्रकरणी सोमवारी न्यायालयात सुनावणी झाली असता, दुर्घटनेतील मृतांच्या कुंटुबियांतर्फे अॅड. प्राची सावंत यांनी बाजू मांडली. त्यात त्यांनी वरील प्रस्तावाबाबत कुटुंबियांशी चर्चा केली असता, सदर रक्कम कमी अाहे. त्यांनी किमान ५० लाख रुपये नुकसानभरपाई मिळावी, अशी विनंती केली आहे. दरम्यान, यावेळी न्यायालयाने वरील माहिती क्लबच्या मालकांना दिली. तसेच याबाबत पुढील सुनावणीत स्पष्ट करण्यास सांगितले आहे.


