गोवन वार्ता प्रतिनिधी
फोंडा
फर्मागुडी येथील आयआयटीमध्ये दोन साहाय्यक प्राध्यापकांची भरती रद्द करण्याचा निर्णय सोमवारी संचालक मंडळाने घेतला. परीक्षेत राकेश डोहलिया व अंकित सिंग यांनी ब्ल्यूटूथचा वापर केल्याने भारतातील १५८ जणांचे परिश्रम वाया गेले आहेत. नवीन भरतीसंबंधी लवकरच निर्णय घेतला जाईल. परीक्षा रद्द करण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे अटक केलेल्या संशयितांना परीक्षेत अधिक गुण मिळाल्याने आयआयटी संचालक मंडळाला कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे. संशयितांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
शनिवारी परीक्षा देऊन घरी जाताना दाबोळी विमानतळावर तपासणीत ब्ल्यूटूथ यंत्र आढळून आल्याने दोघेजण पोलिसांच्या जाळ्यात अडकले होते. फोंडा पोलिसांनी या प्रकरणी राकेश डोहलिया (२९, नवी दिल्ली) व अंकित सिंग (२३, हरियाणा) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून रविवारी अटक केली होती. परीक्षेत दोघांना अधिक गुण मिळाल्याने परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय सोमवारी जाहीर करण्यात आला, अशी माहिती फर्मागुडी येथील आयआयटीचे कुलसचिव डॉ. के. व्ही. रघुत्तमनय यांनी दिली.
१५८ परीक्षार्थींना फटका
फर्मागुडी येथे शनिवारी घेतलेल्या परीक्षेत दोघांनी मोठा गुन्हा केला; पण त्याचा फटका परीक्षा दिलेल्या भारतातील १५८ जणांना बसला. परीक्षेला १६० उमेदवार हजर होते. दोघांनी परीक्षेत ब्ल्यूटूथचा वापर केल्याचे उघडकीस आल्यानंतर देशभरात त्याचे पडसाद दिसून आले.


