अंगणवाडी शिक्षिकांना वार्षिक पगारवाढ : मुख्यमंत्री

राज्यातील अंगणवाडी शिक्षिकांना आता दरवर्षी पगारवाढ मिळणार आहे. यामुळे अंगणवाडी शिक्षिकांचा पगार महिन्याला ४०,००० रुपयांपर्यंत वाढणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. ताळगाव येथे आयोजित ‘अंगण का उत्सव’ कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.

12th October, 11:48 pm
अंगणवाडी शिक्षिकांना वार्षिक पगारवाढ : मुख्यमंत्री

गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी
राज्यातील अंगणवाडी शिक्षिकांना आता दरवर्षी पगारवाढ मिळणार आहे. यामुळे अंगणवाडी शिक्षिकांचा पगार महिन्याला ४०,००० रुपयांपर्यंत वाढणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. ताळगाव येथे आयोजित ‘अंगण का उत्सव’ कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.
हा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त ‘सेवा संकल्प अभियान’ आणि ‘पोषण महिना’अंतर्गत आयोजित करण्यात आला होता. यावेळी महिला व बाल कल्याण मंत्री विश्वजीत राणे, अधिकारी व अंगणवाडी शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. पूर्वी अंगणवाडी शिक्षिकांना दर पाच वर्षांनी १,८०० रुपयांची पगारवाढ मिळत होती. त्यामुळे सेवानिवृत्त होताना त्यांचा पगार २३,००० रुपयांपर्यंत पोहोचत असे. आता नव्या निर्णयानुसार दरवर्षी पगारवाढ मिळणार असल्याने हा पगार ४०,००० रुपयांपर्यंत जाणार आहे. महिला व बालकांसाठीच्या अनेक कल्याणकारी योजना अंगणवाडीच्या माध्यमातूनच लोकांपर्यंत पोहोचतात. देश आणि समाजासाठी महिलांचे योगदान मोठे असून, त्यात अंगणवाडी शिक्षिकांचा वाटा महत्त्वाचा आहे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
राज्यात महिलांसाठी गृहआधार, ममता, प्रधानमंत्री मातृत्व वंदना यांसारख्या योजना सुरू आहेत. मुलींसाठी आता आयटीआयमध्ये मोफत शिक्षण दिले जात आहे. आगामी निवडणुकीपूर्वी ‘गृहआधार’ योजनेचे पैसे वाढवण्याचा सरकारचा विचार असून, लवकरच ही वाढ केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
गोव्यातील अंगणवाडी शिक्षिकांना सर्वाधिक पगार
सद्यस्थितीत ६०,००० महिलांना पोषक आहार योजनेचा लाभ मिळत आहे. भाजप सरकार आल्यानंतर सेवानिवृत्त अंगणवाडी शिक्षिकांना ५ लाख आणि मदतनिसांना ३ लाख रुपये देण्यात आले आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत गोव्यातील अंगणवाडी शिक्षिकांना सर्वाधिक पगार दिला जातो, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

हेही वाचा
सर्व पहा