पणजी : आजच्या नवीन पिढीला नवीन गोवा कसा बनवायचा हे माहिती असेल, मात्र यासाठी त्यांना पूर्वीचा गोवा कसा होता हे माहिती असणे आवश्यक आहे. पूर्वीच्या आणि आताच्या गोव्यातील फरक माहिती असणे आवश्यक असल्याचे मत जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ पत्रकार गुरुदास सावळ लिखित 'गोवा : मुक्ती ते प्रगती' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी 'गोवन वार्ता'चे संपादक पांडुरंग गावकर यांच्यासह प्रदीप घाडी आमोणकर, धर्मा चोडणकर उपस्थित होते.
शिरोडकर यांनी सांगितले की, १५ ते २० वयोगटातील विद्यार्थ्यांना पूर्वीचा गोवा कसा होता हे माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी 'गोवा : मुक्ती ते प्रगती' हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे. यामुळे आम्ही आमच्या सहा शिक्षण संस्थांमध्ये हे पुस्तक ठेवण्याचा निर्णय घेतला असून संस्थांच्या वाचनालयात हे पुस्तक उपलब्ध करून दिले जाईल. आधुनिक पिढीला, विशेष करून 'जेन झी'ला (Gen Z) वरिष्ठ लेखक-पत्रकारांच्या अनुभवांची शिदोरी मिळणे आवश्यक आहे. या प्रक्रियेमध्ये वेळ लागत असला तरी राज्यातील तरुण पिढीसाठी असे करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
ते म्हणाले की, लेखक आणि पत्रकारांनी आपण समाजोपयोगी विषय हाताळत आहोत का नाही, हे तपासून घेतले पाहिजे. वर्षभरात समाजाशी निगडित आपण किती विषय हाताळले आणि किती वेळा सामाजिक प्रश्नांवर लिखाण केले, याचाही विचार करावा. काही वेळेस एखादा विषय गरजेपेक्षा अधिक वेळा हाताळला जातो, परंतु एकच विषय ताणून धरू नये. अद्याप असे अनेक विषय आहेत जे हाताळले गेलेले नाहीत. केवळ गोवा सांभाळला पाहिजे असे म्हणून काहीही होणार नाही, तर याबाबत खोलात जाऊन अभ्यासपूर्वक लिखाण झाले पाहिजे आणि जनमानसात ठसा उमटवतील असे विषय हाताळले पाहिजेत.
"मी माझ्या आयुष्यात माझे आई-वडील, मित्रमंडळी आणि सहकाऱ्यांमुळे घडलो आहे. त्याचबरोबर पत्रकारितेनेदेखील मला घडवले आहे. वर्तमानपत्रात येणारे लेख मी वाचत असे. मी आज जो कोणी आहे, त्यामध्ये वर्तमानपत्रांचे योगदान देखील मोठे आहे," असे सुभाष शिरोडकर यांनी सांगितले.


