राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत उघड केली पुढील आंदोलनाची रणनीती

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत, पोलिसांची वाढती तैनाती आणि धरपकडीवर सडकून टीका केली; तसेच हा लढा दीर्घकाळ चालणार असल्याचे स्पष्ट केले.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
4 hours ago
राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत उघड केली पुढील आंदोलनाची रणनीती

नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून निवडणूक आयोगातील कथित गैरकारभार, कथित मतचोरी आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. काँग्रेस आणि विरोधी पक्ष या मुद्द्यावरून अत्यंत आक्रमक झाले असून दिल्लीत मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. संपूर्ण शहराला जणू छावणीचे स्वरूप आले असताना, आज विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एका विशेष पत्रकार परिषदेत आक्रमक भूमिका घेत पुढील आंदोलनाची रणनीती स्पष्ट केली.  

 दिल्लीच्या विविध भागांत आंदोलकांची पोलिसांकडून सतत धरपकड सुरू असून रेल्वे स्थानके आणि वाहनांमधून कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले जात आहे. या सर्व परिस्थितीवर बोलताना राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर अत्यंत घणाघाती टीका केली. ते म्हणाले की, तुम्ही आणखी पोलीस तैनात करा, आम्हाला हेच हवे आहे. लोकांना आता स्पष्टपणे दिसत आहे की केंद्र सरकार ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी आपली पूर्ण ताकद लावत आहे. जितके ज्ञानेश कुमारांना वाचवले जाईल, तितके हे सरकार अधिक उघडे पडेल, आणि त्यांना वाचवण्याच्या या प्रयत्नात आम्ही ज्ञानेश कुमारांना नियंत्रित करणाऱ्या मूळ लोकांपर्यंत पोहोचणार आहोत, हीच आमची खरी रणनीती असल्याचे त्यांनी निक्षून सांगितले.   

या आंदोलनादरम्यान राहुल गांधींनी पोलीस प्रशासनातील मानसिकतेवरही भाष्य केले. त्यांच्या मते, खुद्द पोलीस कर्मचाऱ्यांमध्येही आज चर्चा सुरू आहे की आपण विद्यार्थ्यांना आणि तरुणांना विनाकारण का मारहाण करत आहोत? ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी आपण आपली ताकद का पणाला लावत आहोत? असा सवाल उपस्थित करत देशातील कोट्यवधी तरुण लोकशाही वाचवण्यासाठी आज रस्त्यावर उतरून संघर्ष करत असल्याचे त्यांनी सांगितले.   

कायदेशीर लढाईबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, सरन्यायाधीशांची भेट घेण्याचे ठरवले होते, परंतु त्यांनी नियमानुसार याचिका दाखल करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आता 'इंडिया' आघाडीच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात अधिकृत याचिका दाखल केली जाणार आहे. आपल्या आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करताना त्यांनी दीर्घकालीन संघर्षाचा नारा दिला. आपले हे आंदोलन सलग सुरूच राहणार असून यासाठी जितके दिवस, महिने किंवा वर्षे लागतील, तेवढा काळ आपण लढू, कारण देश एका दिवसात घडत नाही, अशाच दीर्घकालीन संघर्षातून उभा राहतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा
सर्व पहा