पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारण्याची तयारी : मुख्यमंत्री

आदेश आल्यास दिल्लीतही जाण्यास तयार; आजपर्यंत पक्षाने जी जबाबदारी दिलेली आहे ती मी पार पाडलेली आहे. पक्षाने दिल्लीत जाण्यास सांगितले तर दिल्लीत जाण्याची माझी तयारी आहे. पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडण्यास मी सदैव तयार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले आहे.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
8 hours ago
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारण्याची तयारी : मुख्यमंत्री

पणजी : आजपर्यंत पक्षाने जी जबाबदारी दिलेली आहे ती मी पार पाडलेली आहे. पक्षाने दिल्लीत जाण्यास सांगितले तर दिल्लीत जाण्याची माझी तयारी आहे. पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडण्यास मी सदैव तयार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले आहे.

एका वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यानी ही बाब स्पष्ट केली. माझे वडील भाजपात असल्याने १९९१ पासून पक्षाचे काम पहात आलेलो आहे. मी भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचा प्रदेश अध्यक्ष होतो. राष्ट्रीय युवा मोर्चाचा उपाध्यक्ष होतो. स्व. मनोहर पर्रीकर यांच्या आदेशानुसार सरकारी नोकरी सोडून २००८  सालची पोटनिवडणूक मी लढवली.

पोटनिवडणुकीत मी पराभूत झालो होतो. मात्र तद्नंतर २०१२, २०१७ व २०२२ या तिन्ही निवडणुका मी जिंकलेल्या आहेत. विकसित भारत २०४७ व विकसित गोव्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजप सरकार असणे आवश्यक आहे. आगामी २५ वर्षे भाजपचे सरकार असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

काँग्रेसला राज्यात कोणतेही भवितव्य नाही. काँग्रेसला भवितव्य नसल्याने व भाजपची विचारधारा पटल्याने काँग्रेस आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे ते म्हणाले.भाजप सरकारने जे कार्य केलेले आहे, त्या कार्याच्या आधारे भाजप निवडणूक जिंकत आहे. तोडफोड करून भाजप निवडणूक जिंकत नाही. काँग्रेसला राजकारण करून निवडणुका जिंकता येत नाहीत. यासाठी पूर्वी ते इव्हीएमला दोष देत होते. आता एसआयआरला दोष देत आहेत. एसआयआरची प्रक्रिया देशात पूर्वीपासून सूरू आहे. ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आहे.

देशात व गोव्यात योग्य प्रकारे प्रक्रिया पार पडलेली आहे. गोव्याच्या मतदार यादीतून जी ९७ नावे वगळण्यात आली होती, त्यापैकी ८८ जणांनी पुन्हा फॉर्म ६ भरलेला आहे. ३ जणांकडे पोर्तुगीज पासपोर्ट आहे तर ६ जण विदेशात आहेत. विदेशात असलेल्या व्यक्तीपर्यंत बीएलओ पोचू शकत नाहीत. जे मतदार हयात नाहीत व ज्यांची नोंदणी अन्य राज्यात आहे; त्यांची नावे मतदार यादीतून वगळणे क्रमप्राप्त आहे. राहुल गांधी व काँग्रेस पक्ष सरळ राजकारण करत नाही, असा आरोप मुखमंत्र्यांनी केला.

राज्यात विरोधकांकडून भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. यावरून मंत्री असलेल्या गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून हटविण्यात आले होते. याबद्धल विचारले असता, गावडे यांना भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे हटविण्यात आले नव्हते, असा खुलासा त्यांनी केला. एका अन्य कारणासाठी त्यांना हटवून त्याच समाजातील दुसऱ्या आमदाराला मंत्रीपद दिले गेले. भ्रष्टाचार कमी करण्यासाठी इ सुशासन, इज ऑफ डूइंग बिजनेस या पद्धतीची कार्यवाही सूरू झालेली आहे.

पर्यटनाबरोबर जहाज बांधणी, फार्मसी, हॉस्पिटेलिटी या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या तयार होत आहेत. गोमंतकीय तरुणांना कार्यकुशल करण्यासाठी अभ्यासक्रम व प्रशिक्षण सूरू झाले आहे. या उद्योगात गोमंतकीय आता नोकरी करू लागले आहेत. मजुरांची कामे गोमंतकीयांना जमत नाहीत म्हणून परराज्यातील मजूर येत आहेत. यामुळे गोव्यात स्थलांतारितांचे प्रमाण वाढत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

पर्यटन वाढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सूरू आहेत. योग्य दरात टॅक्सी सेवा उपलब्ध होण्यासाठी गोवा माईल्स सेवा सूरू आहे. याशिवाय गोव्यात डिजिटल टॅक्सी सेवा सूरू करण्यात येईल. विमानतळावरून शहरात येण्यासाठी कदंब बसगाड्या सुरू करण्यात आलेल्या आहेत. मोकाट गुरे व कुत्र्यांच्या उपद्रवावरही लवकरच उपाय होईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

हेही वाचा
सर्व पहा