काणकोणमध्ये ११ ते १३ डिसेंबर दरम्यान आदी लोकोत्सवाचे आयोजन : मंत्री रमेश तवडकर

आदर्श युवा संघ आणि बलराम शैक्षणिक संस्थेतर्फे यंदा ११ ते १३ डिसेंबर दरम्यान आदी लोकोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव आदर्शग्राम, आमोणे, पैंगीण येथे होईल. महोत्सवात राज्यभरातील विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी होतील. तीन दिवसांत साधारणपणे २ लाख लोक महोत्सवात सहभागी होण्याची अपेक्षा असल्याचे कला आणि संस्कृती मंत्री रमेश तवडकर यांनी सांगितले. सोमवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सविता तवडकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
5 hours ago
काणकोणमध्ये ११ ते १३ डिसेंबर दरम्यान आदी लोकोत्सवाचे आयोजन : मंत्री रमेश तवडकर

पणजी : आदर्श युवा संघ आणि बलराम शैक्षणिक संस्थेतर्फे यंदा ११ ते १३ डिसेंबर दरम्यान आदी लोकोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव आदर्शग्राम, आमोणे, पैंगीण येथे होईल. महोत्सवात राज्यभरातील विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी होतील. तीन दिवसांत साधारणपणे २ लाख लोक महोत्सवात सहभागी होण्याची अपेक्षा असल्याचे कला आणि संस्कृती मंत्री रमेश तवडकर (Art and Culture Minister Ramesh Tawadkar) यांनी सांगितले.
सोमवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सविता तवडकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
रमेश तवडकर यांनी सांगितले की, यंदा या महोत्सवाचे २६ वे वर्ष आहे. महोत्सवाद्वारे स्थानिक संस्कृती, कला, परंपरा आदींचे संवर्धन करण्याचे काम केले जात आहे. या महोत्सवाची नोंद राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेण्यात आली आहे.

महोत्सवादरम्यान सुमारे ४५० महिला स्वयंसहाय्यता गटांना आपल्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी मंच मिळतो. याद्वारे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे. येथे पारंपारिक औषधे, जुन्या गोष्टींचे प्रदर्शन देखील केले जाते. यामुळे विद्यार्थ्यांना आपले पूर्वज कोणत्या गोष्टी वापरत होते याची माहिती मिळते. महोत्सवात विविध राज्यांतील पारंपारिक नृत्यांचे प्रदर्शन होईल.
महोत्सवात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये नृत्य, पारंपारिक खेळ, आधुनिक खेळ, रांगोळी स्पर्धा, पथनाट्य स्पर्धा, विज्ञान प्रकल्प स्पर्धा, कथाकथन, घुमट आरती, प्रश्नोत्तर स्पर्धा अशा विविध स्पर्धांचा समावेश आहे. स्पर्धा प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आणि खुल्या गटात घेतली जाईल.

याशिवाय येथे कायाकिंग, शूटिंग, कमांडो ब्रिज , धनुर्विद्या अशा क्रीडा प्रकारांचा अनुभव देखील घेता येणार आहे. राज्यातील सर्व लोकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन तवडकर यांनी केले.

हेही वाचा
सर्व पहा