वास्को : वेर्णा औद्योगिक वसाहतीतील परम लॉजिस्टिक या कंपनीच्या पहिल्या मजल्यावर भीषण आग लागली आणि सर्वत्र पसरली. वेल्डिंगचे काम सुरू असताना अचानक गांधील माशांनी हल्ला केल्याने कामगाराने हातातील वेल्डिंगचे सामान टाकून दिले. आणि ते नेमके कंपनीतील गोदामातील भंगार आणि पेंट साठवून ठेवलेल्या ठिकाणी पडले. त्यामुळे आग भडकली. यासंदर्भात वेर्णा अग्निशमन दलाला माहिती मिळताच तत्काळ येऊन आग विझवली. त्यामुळे मोठी घटना टळली.
वेर्णा अग्निशमन दलाचे अधिकारी दिलेश गावकर यांनी सांगितले की, आग लागल्याची माहिती मिळताच धाव घेतली. गोदामात साठवून ठेवलेल्या भंगारात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक सामान व पेंट होता. त्यामुळे आग भडकली. दलाने वेर्णा, वास्को, फोंडा आणि मडगावातील एकूण चार बंब वापरून आग विझवली. अग्नीशमन दलाच्या जवानांनी मोठे प्रयत्न करून आग विझवली. अन्यथा आतील प्लास्टिक व पेंटमुळे आग आणखी भडकण्याची शक्यता होती. त्याचबरोबर मोठी दुर्घटनाही घडण्याची शक्यता होती. औद्योगिक वसाहतीत अशा घटना घडू नयेत म्हणून पुरेशी खबरदारी घेणे आवश्यक असल्याची माहिती अग्निशमन दलातील सूत्रांनी दिली.
गांधील माशांमुळे लागली आग
कंपनीत वेल्डिंगचे काम सुरू असताना अचानक गांधील माशांनी हल्ला केला. त्यामुळे कामगाराने आपल्या हातातील वेल्डिंगचे साहित्य दूर टाकून दिले. ते नेमके भंगारातील प्लास्टिक आणि पेंटवर पडले आणि आग भडकल्याची माहिती अग्निशमन दलातील सूत्रांनी दिली.


