म्हापसा येथील बार्देश बाजारची जागा रिकामी करा; सरकारची नोटीस

प्रस्तावित सरकारी बार्देश भवन उभारण्याची प्रक्रिया सुरू; म्हापसा येथील जीर्ण आणि अपुऱ्या जागेमुळे अडगळीची ठरलेल्या बार्देश बाजार संकुल इमारतीच्या स्थळी नवीन सरकारी बार्देश भवन संकुल उभारण्याची प्रकिया सरकारने सुरू केली आहे. याच अनुषंगाने इमारतीच्या आवारातील बार्देश बाजार ग्राहक सहकारी सोसायटीचे मुख्यालय असलेली जागा तातडीने रिकामी करण्याची नोटीस बजावली आहे.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
42 mins ago
म्हापसा येथील बार्देश बाजारची जागा रिकामी करा; सरकारची नोटीस

म्हापसा : येथील जीर्ण आणि अपुऱ्या जागेमुळे अडगळीची ठरलेल्या बार्देश बाजार संकुल इमारतीच्या स्थळी नवीन सरकारी बार्देश भवन संकुल उभारण्याची प्रकिया सरकारने सुरू केली आहे. याच अनुषंगाने इमारतीच्या आवारातील बार्देश बाजार ग्राहक सहकारी सोसायटीचे मुख्यालय असलेली जागा तातडीने रिकामी करण्याची नोटीस बजावली आहे.

जीएसआयडीसीच्या पत्राचा संदर्भ घेत बार्देशचे गटविकास अधिकारी प्रथमेश शंकरदास यांनी ही नोटीस सोसायटीला पाठवली आहे. सार्वजनिक हिताच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या बार्देश भवन प्रकल्पासाठी सोसायटीने स्वतःची पर्यायी व्यवस्था करावी, आणि गटविकास अधिकारी कार्यालयाच्या अखत्यारित येणारी ही जागा लवकरात लवकर सरकारकडे सुपूर्द करावी, अशी विनंती त्यांनी बार्देश बाजार ग्राहक सहकारी सोसायटीला केली आहे.

मरड, म्हापसा येथील विद्यमान तीन मजली सरकारी संकुल इमारतीच्या जागी नवीन सहा मजली संकुल सरकारकडून गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या (जीएसआयडीसी) मार्फत उभारले जाणार आहे. जीएसआयडीसीच्या प्रस्तावित बार्देश भवन संकुलाच्या आखणीत बार्देश बाजारची ९६० चौ.मी. जागा आणि ४४० चौ.मी. बांधकाम असलेली शेड-इमारत पूर्णपणे येत आहे. प्रकल्पाचे काम, जागेचे सपाटीकरण व पाडकाम विनाविलंब सुरू करण्यासाठी या जागेचा प्रत्यक्ष  ताबा मिळणे आवश्यक आहे. पंचायत संचालनालय आणि सोसायटी यांच्यातील कराराप्रमाणे ही जागा १३ नोव्हेंबर २०१२ ते १२ नोव्हेंबर २०१७ या कालावधीसाठी पाच वर्षांच्या भाडेपट्टीवर देण्यात आली होती. सदर कराराची मुदत १२ नोव्हेंबर २०१७ रोजीच संपली असून सक्षम प्राधिकरणाकडून त्याचे नूतनीकरण किंवा मुदतवाढ करण्यात आलेली नाही, असे या नोटीसीमध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान;  जागा रिकामी करून तिचा ताबा देण्याबाबत गटविकास अधिकाऱ्यांच्या नोटीसीनंतर बार्देश बाजार ग्राहक सहकारी सोसायटीने आवश्यक पर्यायी जागेची चाचपणी सुरू केली आहे. काही हितचिंतकांनी सोसायटीला स्वतःहून जागा देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यादृष्टीने संचालक मंडळाने अंतिम निर्णय घेतल्यावर ही जागा रिकामी करण्यात येईल, अशी माहिती सोसायटीच्या सूत्रांकडून मिळाली आहे.

पर्यायी जागेचा शोध सुरू : खलप

 सरकारच्या जागा रिकामी करण्याच्या नोटीसीनुसार आम्ही पर्यायी जागा शोधत आहोत. ही जागा मिळताच जमिनीचा ताबा सरकारकडे दिला जाईल. तसेच आम्ही यासंदर्भात सहकार मंत्री आणि इतरांची भेट घेतली आहे. प्रस्तावित सरकारी संकुल आराखड्यात सरकारने बार्देश बाजारला जागा ठेवलेली आहे, अशी माहिती बार्देश बाजारचे चेअरमन निखीलचंद्र खलप यांनी दिली.

हेही वाचा
सर्व पहा