पणजी: कर्मचारी भरती आयोगाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अन्न सुरक्षा अधिकारी (Food Safety Officer) आणि पशू चिकित्सा साहाय्यक (Veterinary Assistant) मिळून एकूण ३२ पदे भरण्यासाठी पूर्वी जारी करण्यात आलेली नोकरभरती जाहिरात आयोगाने अधिकृतपणे मागे घेतली आहे.
आयोगाने ही जाहिरात ३० सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केली होती. या जाहिरातीनुसार अन्न सुरक्षा अधिकारीसाठी ५ पदे भरण्यात येणार होती, ज्यामध्ये २ पदे ओबीसी प्रवर्गासाठी आणि १ पद एसटी प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले होते. तसेच पशू चिकित्सा साहाय्यक पदांच्या २७ जागांसाठी अर्ज मागवण्यात येणार होते; यात सर्वसामान्य उमेदवारांसाठी १३, एसटी प्रवर्गासाठी ४, एससीसाठी १, ओबीसीसाठी ७ आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी २ पदांचा समावेश होता. या भरतीसाठीचे अर्ज भरण्याचे ऑनलाइन पोर्टल लवकरच खुले होणार होते. मात्र, अर्ज प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच आयोगाने ही जाहिरात मागे घेत असल्याची नोटीस जारी केली.
दरम्यान, अपात्र उमेदवारांनी अर्ज केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची ताकीदही आयोगाने यापूर्वी दिली. राज्यामध्ये आगामी निवडणुकीचे वातावरण तापत असताना आणि एकीकडे विविध पदांसाठी संगणक आधारित परीक्षा (CBT) व त्यांचे निकाल जाहीर होत असताना, अचानक ३२ पदांची ही जाहिरात मागे घेतल्यामुळे परीक्षार्थींमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही जाहिरात नक्की कोणत्या कारणांमुळे मागे घेण्यात आली, याबाबतचे अधिकृत कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.


