वास्को : चिखली पंचायतीच्या कर्मचारी सोनाली नाईक यांनी अचानक करण्यात आलेल्या बदलीच्या निषेधार्थ आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांची चिखली येथून सुमारे ५० किलोमीटर दूर सांत इस्तेव्ह येथे बदली करण्यात आली होती. या प्रकरणी नाईक यांनी चिखली पंचायतीच्या उपसरपंच ऐश्वर्या कोरगावकर यांच्यावर राजकीय आकसातून कारवाई केल्याचा आरोप केला आहे.
सोनाली नाईक या गेल्या ११ वर्षांपासून चिखली पंचायतीत कार्यरत होत्या. अचानक करण्यात आलेल्या बदलीमुळे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यांना दोन लहान मुले असून, ही बाब माहीत असतानाही त्यांची दूरच्या ठिकाणी बदली करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
सरपंच कमला प्रसाद यादव यांचा नाईक यांना पाठिंबा
दरम्यान, चिखलीच्या सरपंच कमला प्रसाद यादव यांनी नाईक यांना पाठिंबा दर्शवला आहे. निष्ठेने काम करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप करत त्यांनी या प्रकरणात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे.
या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून सोनाली नाईक यांना न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन सरपंच यादव यांनी केले आहे. अचानक बदली करण्यामागील कारणांवरून आता पंचायत वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.


