पणजी : सत्तरी, काणकोण भागात मोठ्या प्रमाणात अल्वारा जमीन आहे. अल्वारा जमिनीचा शेतीसाठी उपयोग न होता तिची घरे बांधण्यासाठी विक्री होत आहे. अल्वारा जमिनीची खरेदी करताना सतर्कता बाळगण्याची गरज आहे. घरे बांधण्यासाठी अल्वारा जमिनीची खरेदी केली असेल तर ते संकटात सापडतील, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी दिला आहे.
वाळपई येथे विभागीय कृषी कार्यालयाचे उद्घाटन झाले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हा इशारा दिला. माझे घर योजना, वन हक्के दावे, पूरण शेती अशा विविध विषयांवर मुख्यमंत्र्यांनी यावेळी भाष्य केले.
अल्वारा जमीन ही शेती करण्यासाठी देण्यात आली आहे. अल्वारा जमिनीत पूर्वी घर असल्यास ते नियमित केले जाईल. मात्र इतरांना घरे बांधण्यासाठी अल्वारा जमिनीची विक्री करता येणार नाही. सरकारी तसेच कोमुनिदादची जागा शेतीसाठी असेल तर शेतीसाठीच तिचा वापर करायला हवा. शेतजमिनीच्या विक्रीवर सरकारने निर्बंध आणले आहेत. शेतकरी हा अन्न निर्माण करीत असल्याने तो अन्नदाता आहे. यामुळे त्याला अधिक सवलती मिळायलाच हव्यात. कृषी क्रेडीट कार्ड, किसान कार्ड ज्या शेतकऱ्यांनी केलेले नाही, त्यानी ते करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
घर नावावर करण्यासाठी माझे घर योजनेबरोबर वन हक्क दावे निकालात काढण्याची प्रक्रीयाही सुरू झाली आहे. वन हक्क दाव्यांसाठी आलेल्या १० हजार अर्जांपैकी आता पर्यंत साडे तीन हजार अर्ज निकालात काढण्यात आले आहेत.


