फोंडा : तळपण-शिरोडा येतील शेती पाऊस नसल्याने करपली आहे. परिसरातील ४०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांना याचा फटका बसला असून सरकारने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्ग करीत आहे. मात्र, गेल्या वर्षी कृषी खात्याने काही मोजक्याच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिल्याने शेतकरी वर्ग भविष्यात शेती पडिक ठेवण्याची शक्यता आहे.
शिरोडा भागात मोठ्या प्रमाणात शेतकरी भात शेतीची लागवड करतात. पण यावर्षी पाऊस वेळेवर पडला नसल्याने आणि गेले १५-२० दिवस पाऊस गायब झाल्याने संपूर्ण शेती करपण्याच्या मार्गावर आहे. सध्या काही भाग करपला असून त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतीचा काही भाग काळा व लाल झालेला आहे. त्यामुळे सध्या तरी पाऊस कोसळला तरी शेतीचे नुकसान निश्चित मानले जात आहे. या भागात वेगवेगळ्या गावातील शेतकरी भात शेतीची लागवड करतात. गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कडक उन्हात शेतीची कणसे कारपली आहेत. पुढील काही दिवसांत आणखीन कणसे करपण्याची शक्यता आहे. काही वेळा कापणीच्या वेळी मोठा पाऊस कोसळल्याने शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले होते. कृषी खात्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी आवश्यक प्रक्रिया केली होती. पण काही मोजक्याच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली होती. त्यामुळे नुकसान भरपाई मिळाली नसलेले शेतकरी सध्या शेती पडिक ठेवण्याच्या मार्गावर आहेत.
पूर्वजांची शेती स्थानिक शेतकरी परतात. पण दरवर्षी नुकसान पत्करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने शेती करपली आहे. पुढील काही दिवसांत शेती काळ्या रंगाची दिसून येण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून कृषी खात्याने गांभीर्याने लक्ष देऊन सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची आवश्यकता असल्याचे जेरोन आलेमाव यांनी सांगितले.
सरकार नुकसान भरपाई देण्याची आश्वासने देते. पण सरकारची आश्वासने अस्तित्वात येत नाहीत. गेल्या वर्षी नुकसान भरपाईसाठी सर्व प्रक्रिया पूर्ण केली होती. पण काही मोजक्याच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली होती. त्यामुळे शेतकरी वर्ग सरकारच्या आश्वासनावर अवलंबून न राहता शेती पडीक ठेवण्याचा निर्णय घेण्याची शक्यता असल्याचे रामचंद्र नाईक यांनी सांगितले.


