पणजी : मी दिल्लीला जाण्याबाबतच्या विधानाचा काहींनी वेगळाच अर्थ काढला. काहींना आनंद झाला, तर काहींना दुःख झाले. भारतीय जनता पक्षाने गोव्याची सेवा करण्याची संधी मला दिली, आणखी पुढील वर्षेही सेवा करण्याची संधी द्यावी ही पक्षाकडे मागणी आहे. पण याविषयी निर्णय पक्ष घेतो, असे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी सांगितले.
मी दिल्लीत असताना एएनआयच्या स्मिता प्रकाश यांच्या पॉडकास्टमध्ये गेलो. त्यांनी माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासंदर्भात प्रश्न विचारताना त्यांना दिल्ली आवडत नव्हती, ते दिल्लीतून परत गोव्यात जायचे, तुम्हाला दिल्लीत बोलावले तर तुम्ही काय कराल असे विचारले. त्यावर माझी प्रतिक्रिया देताना मी भाजपचा कार्यकर्ता आहे. जेव्हा जेव्हा मला पक्ष जे सांगतो ते मी करतो, त्या अनुषंगाने मी बोललो. पण काहींनी त्याचा वेगळाच अर्थ काढला, असे ते म्हणाले.
काहींना उकळ्या फुटल्या काहींना दुःख झाले. पण माझा पक्ष भाजपने मला गोव्याची सेवा करण्याची संधी दिली. त्यामुळे यापुढेही खूप वर्षे मला सेवा करण्याची संधी द्यावी, ही माझ्या पक्षाकडे मागणी आहे. शेवटी तो निर्णय पक्ष घेतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, एएनआयची मुलाखत सविस्तर पाहिल्यास तुमच्या लक्षात हे येईल, असेही ते पत्रकारांना म्हणाले.


