काँग्रेसच्या गोवा राखण यात्रेवरून मुरगावात भाजप विरुद्ध भाजप

रॉड्रिग्ज, कामत यांचा विरोधाचा सूर : आमोणकर, सावईकर यांचा पलटवार

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
11th October, 07:44 pm
काँग्रेसच्या गोवा राखण यात्रेवरून मुरगावात भाजप विरुद्ध भाजप

वास्को : गोव्यातील जनतेला परिवर्तन हवे आहे, गोव्यातील भाजपाला पाच वर्षे सत्तेपासून दूर ठेवा, असे आवाहन मुरगावचे माजी नगराध्यक्ष लिओ रॉड्रिग्ज व माजी उपनगराध्यक्ष रामचंद्र कामत यांनी केले. तथापी त्यांच्यावर पलटवार करताना त्यांच्या मतांना काहीच महत्त्व नसल्याचे माजी खासदार अ‍ॅड. नरेंद्र सावईकर यांनी स्पष्ट केले. तसेच गोवा राखण यात्रा हा मरणासन्न पक्षाला वाचविण्यासाठी केलेला एक केविलवाणा स्टंट असल्याचे त्यांनी सांगितले. मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनीही त्या दोघांवर टीका केली.

दोन दिवसांपूर्वी येथे काँग्रेसच्या गोवा राखण यात्रेला लिओ रॉड्रिग्ज व रामचंद्र कामत यांनी उपस्थिती लावली. रॉड्रिग्ज हे भाजपच्या पाठिंब्यावर सुमारे एक वर्षापेक्षा अधिक काळ नगराध्यक्ष होते. तर, कामत यांनी सुमारे तीन वर्षे उपनगराध्यक्ष पद भूषविले होते. त्यांच्याविरोधात अविश्र्वास ठराव आणून त्यांना पदावरून हटविण्यात आले होते. त्यामुळे गोवा राखण यात्रेला त्यांच्या उपस्थितीबद्दल लोकांनी आश्र्चर्य व्यक्त केले. यात्रेदरम्यान बोलताना त्या दोघांनी गोव्यातील भाजपाला लक्ष्य केले.

गोवा विकू देणार नाही, भाजपाला जिंकू देणार नाही ही चांगली संकल्पना आहे. भाजप गेली चौदा- पंधरा वर्षे सत्तेवर आहे. लोकांना भाजपचा कंटाळा आला आहे. त्यामुळे लोक रस्त्यावर येत आहे, असे रॉड्रिग्ज यांनी सांगितले. लोकांनी हे सरकार पुरे झाले, आता बदलाची गरज आहे हे लक्षात ठेवावे, असे आवाहन त्यांनी केली. रामचंद्र कामत यांनीही रॉड्रिग्ज यांची बाजू मांडली. मी पूर्वाश्रमीचा काँग्रेस कार्यकर्ता, परंतु गेली वीस वर्षे मी भाजपात होतो. या राज्य सरकारला लोक आता कंटाळले आहेत. जनता आता स्वखुषीने रस्त्यावर येत आहे. विकासाच्या नावावर भलतेच होत असल्याचा दावा त्यांनी केला. गोव्यातील या सरकारला आराम देण्याची वेळ आली आहे. विरोधक म्हणून भाजप चांगले काम करते असे ते म्हणाले. मी फक्त गोव्यातील भाजप सरकारबद्दल बोलत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अ‍ॅड. सावईकर यांनी रॉड्रिग्ज व कामत यांच्या आवाहनाला कोणतीही किंमत नसल्याचे स्पष्ट केले. भाजप शासनावर लोकांचा पूर्ण विश्वास आहे. लोकांनी भाजप व काँग्रेस कार्यपद्धतीलील स्पष्ट फरक अनुभवला असल्याचे ते म्हणाले.

आमदार आमोणकर यांनी रॉड्रिग्ज व कामत हे पक्षाचे सदस्य नसून, त्यांना पक्षात कोणतेही स्थान नसल्याचे स्पष्ट केले. पराभूत झालेल्या एका हताश राजकारण्याने वापरलेले ते दोघे केवळ प्यादे असल्याचे सांगून त्यांची खिल्ली उडविली.


हेही वाचा
सर्व पहा