गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी
मतदारसंघात प्रत्यक्ष काम करणाऱ्या आणि मतदारांच्या सातत्याने संपर्कात असणाऱ्या आमदार किंवा कार्यकर्त्यांनाच आगामी निवडणुकीत उमेदवारी दिली जाईल. सध्या आमदार आहे म्हणून पुढील निवडणुकीत तिकीट मिळणारच, असे कोणीही गृहीत धरू नये, असे स्पष्ट संकेत भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी बैठकीत दिले. तसेच, मगो पक्षासोबत जागावाटपाबाबत लवकरच चर्चा केली जाईल, अशी माहिती आमदार मायकल लोबो यांनी बैठकीनंतर दिली.
भाजपचे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस बी. एल. संतोष, सह-संघटन मंत्री शिवप्रकाश आणि सह-प्रभारी अनिल अँटनी यांचे रविवारी गोव्यात आगमन झाले. त्यांनी पणजी येथील भाजप मुख्यालयात पक्षाच्या आमदारांसोबत महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांच्यासह इतर मंत्री आणि आमदार उपस्थित होते.
विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर आली आहे. निवडणूक तयारीचा भाग म्हणून संघटन मंत्री बी. एल. संतोष यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक झाली. समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, मत्स्योद्योग मंत्री नीळकंठ हळर्णकर, आमदार देविया राणे आणि आमदार प्रवीण आर्लेकर यांनी या बैठकीविषयी पत्रकारांना माहिती दिली. पुढील तीन महिने पक्षासाठी महत्त्वाचे आहेत. लोकांचे काम करतो आणि जनतेशी जोडलेला आहे, त्यालाच उमेदवारी मिळेल, असे संकेत केंद्रीय नेत्यांनी दिले आहेत. आमदार किंवा कार्यकर्ता, कोणालाही उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे. निवडणूक तोंडावर असल्याने जनसंपर्क वाढवण्यासोबतच मतदारसंघावर लक्ष केंद्रित करण्याची सूचना बैठकीत करण्यात आली. केंद्रीय नेत्यांनी मंत्री आणि आमदारांच्या समस्या, तसेच निवडणुकीच्या तयारीबाबतच्या सूचना ऐकून घेतल्याची माहिती मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली...
इच्छुकांची वाढती संख्या पक्षासाठी फायदेशीर
पेडणे मतदारसंघात भाजपच्या उमेदवारीसाठी १३ जण सक्रिय आहेत, तर कळंगुट मतदारसंघातही अनेक जण तयारी करत आहेत. मतदारसंघात जितके जास्त लोक काम करतील, तितका पक्षाचा विस्तार होईल. कळंगुटमध्ये अनेक जण उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत हे पाहून मला आनंद होत आहे, शेवटी जो काम करेल त्यालाच तिकीट मिळेल, असे लोबो म्हणाले.


