उन्हाच्या तडाख्यामुळे शेतीचे नुकसान वाढणार

सध्याच्या वाढत्या उन्हामुळे हे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता आहे. काही भागांत भातपीक तयार झाल्यामुळे कापणी सुरू आहे, तर काही ठिकाणी पीक तयार झालेले नाही. कडक उन्हामुळे रोपे तसेच भाताची कणसे कोमेजून जाण्याची शक्यता असून, यामुळे नुकसानीचा आकडा वाढू शकतो.


3 hours ago
उन्हाच्या तडाख्यामुळे शेतीचे नुकसान वाढणार

गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी
पावसाचे कमी प्रमाण आणि आता सुरू झालेल्या कडक उन्हामुळे शेतीचे नुकसान वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. कृषी खात्याच्या प्राथमिक अंदाजानुसार, सप्टेंबर महिन्यापर्यंत २५ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. सध्याच्या वाढत्या उन्हामुळे हे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता आहे. काही भागांत भातपीक तयार झाल्यामुळे कापणी सुरू आहे, तर काही ठिकाणी पीक तयार झालेले नाही. कडक उन्हामुळे रोपे तसेच भाताची कणसे कोमेजून जाण्याची शक्यता असून, यामुळे नुकसानीचा आकडा वाढू शकतो. मात्र, ‘शेतकरी आधार निधी’अंतर्गत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची तरतूद आहे, अशी माहिती कृषी संचालक चंद्रहास देसाई यांनी दिली.
गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात थोडा पाऊस पडला, तरी रोपे टवटवीत राहतात. परंतु, वाळपई आणि साखळीचा अपवाद वगळता राज्यात इतर कुठेही पाऊस पडलेला नाही. त्यामुळे नुकसान नक्कीच होणार, अशी भीती शेतकऱ्यांतून व्यक्त केली जात आहे. मान्सून संपल्यानंतर गेल्या आठवड्यात विभागीय कृषी अधिकाऱ्यांनी शेतीचा आढावा घेतला. पाऊस नसल्यामुळे २५ हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याचे पाहणीतून स्पष्ट झाले. या पाहणीनंतरही हवामानात बदल झालेला नसल्याने नुकसानीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. नुकसानभरपाईसाठी अर्ज आल्यानंतर शेतीची प्रत्यक्ष पाहणी केली जाईल आणि झालेल्या नुकसानीच्या प्रमाणात भरपाई दिली जाईल. गेल्या वर्षीही ‘शेतकरी आधार निधी’अंतर्गत शेतकऱ्यांना भरपाई देण्यात आली होती.
सप्टेंबर महिन्यात काही भागांत अधूनमधून पावसाच्या सरी कोसळल्या. काणकोण, सांगे आणि केपे तालुक्यांत पाऊस समाधानकारक झाला; मात्र पेडणे, बार्देश आणि मुरगाव तालुक्यांत पावसाचे प्रमाण खूपच कमी राहिले. पाऊस पडला तिथे गारवा आहे. पाऊस न पडलेल्या भागातील पीक सुकण्याची भीती आहे. डोंगराळ भागातील मातीमध्ये पाणी टिकून राहत नाही. तिथे ओढे किंवा पाटाच्या पाण्याचा गारवा उपलब्ध नसतो. ही शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून असते. त्यामुळे ज्या डोंगराळ भागात पाऊस पडला नाही, तिथेच नुकसानीचे प्रमाण अधिक आहे. ऑक्टोबर सुरू झाला तरी पावसाचा पत्ता नाही. सप्टेंबरमध्ये एकही दिवस १ इंचापेक्षा जास्त पाऊस झालेला नाही. कडक उन्हामुळे तापमान वाढत आहे आणि याचा परिणाम म्हणून रोपांची मुळे करपू लागली आहेत.
यंदा सरासरीपेक्षा ३१ टक्के पाऊस कमी
गोव्यात यंदा ८२ इंच मान्सून पावसाची नोंद झाली असून, हे प्रमाण सरासरीपेक्षा ३१ टक्के कमी आहे. एरवी मान्सूनचा पाऊस १२० इंचांपेक्षा जास्त पडायचा आणि शेतात पाणी साचल्यामुळे नुकसान व्हायचे. यंदा मात्र परिस्थिती अगदी उलट आहे. पीक आल्यानंतर जास्त पावसाची गरज नसते; पण रोपे टवटवीत राहण्यासाठी अधूनमधून पावसाच्या सरी आवश्यक असतात, असे कृषी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा
सर्व पहा