लोकांसाठी काँग्रेस सत्तेत येणे गरजेचे !


3 hours ago
लोकांसाठी काँग्रेस सत्तेत येणे गरजेचे !

कुंकळ्ळीतील ‘गोवा राखण यात्रे’त सहभागी झालेले तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी. सोबत युरी आलेमाव, माणिकराव ठाकरे, अंजली निंबाळकर, आमदार एल्टन डिकॉस्टा व इतर.
...
गोवन वार्ता प्रतिनिधी
मडगाव
जो जिता वही सिकंदर, त्यामुळे जिंकण्यासाठीच प्रयत्न करा. गोव्यात काँग्रेस सत्तेत आल्यास देशातही काँग्रेस सरकार येईल. लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी प्रयत्न करत बहुमताचे सरकार सत्तेत आणा, असे आवाहन तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केले.
कुंकळ्ळी येथे रविवारी ‘गोवा राखण यात्रे’ला मोठा प्रतिसाद लाभला. या यात्रेत रेवंत रेड्डी, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, प्रभारी माणिकराव ठाकरे, अंजली निंबाळकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार एल्टन डिकॉस्टा, कार्लुस फेरेरा, किरणकुमार रेड्डी, फ्रान्सिस सार्दिन आदी नेते सहभागी झाले होते. रेवंत रेड्डी यांनी भाषणाची सुरुवात ‘माज्या मोगाळ गोंयकारानो’ असे करताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. रेवंत रेड्डी म्हणाले की, देशात संविधान बदलण्याचे प्रयत्न होत आहेत. गरीब लोकांची नावे मतदारयादीतून काढण्यासाठी ज्ञानेश कुमारांचा वापर केला जात आहे. आंदोलकांवर अत्याचार केले जात आहेत. त्यामुळे राहुल गांधी लोकांचा आवाज बनून लढा देत आहेत. या यात्रेतून लोकांना चांगल्या भविष्याची आशा दिसून येत आहे. भाजपला हरवण्यासाठी काँग्रेसलाच मतदान करा, इतर कुणालाही नाही. कारण इतर भाजपचीच पिलावळ आहेत, हे विसरू नका. तेलंगणातही याआधीच्या दोन निवडणुकांत पक्षांतराचा सामना करावा लागला. तीच परिस्थिती गोव्यात असून लोक काँग्रेसच्या पाठिशी राहतील.


आगामी निवडणूक जिंकण्यासाठी रेवंत रेड्डी यांचे मार्गदर्शन घेतले जाईल. काँग्रेसची यात्रा लोकांची चळवळ झाली आहे. या यात्रेने लोकांना त्रास केला नाही; पण सरकारने प्रशासनाला हाती धरून त्रास देण्याचा प्रयत्न केला. लोकांनी एकत्र राहिल्यास काँग्रेसची सत्ता नक्कीच येईल.
_ एल्टन डिकॉस्टा, आमदार

राज्य सरकारने यात्रेत अनेक अडचणी आणल्या. सध्या देशात व राज्यात हुकूमशाही सुरू आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी काँग्रेसला साथ द्या.
_ युरी आलेमाव, विरोधी पक्ष नेते


भाजपला हरवण्याची ताकद काँग्रेसमध्ये आहे. काही पक्ष भाजपला साथ देत असून विरोधकांची एकजूट तोडण्याचे काम करत आहेत. कुणाच्या आदेशानुसार हा पक्ष काँग्रेसला कमजोर करत आहे, हे लोकांनी समजून घेतले पाहिजे.
_ माणिकराव ठाकरे, गोवा प्रभारी, काँग्रेस     
 

हेही वाचा
सर्व पहा