पणजी : चिखली ग्रामसभेची बैठक आज रविवार, ११ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सत्रात पार पडली. गावात योग्य आणि प्रभावी मलनिःसारण प्रणाली (Sewerage Infrastructure) उभारण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची मागणी करणारा महत्त्वाचा ठराव सर्वसम्मतीने मंजूर करण्यात आला. गावामध्ये हा प्रश्न उग्र रूप धारण करण्यापूर्वी आणि सार्वजनिक आरोग्याचा मोठा संकट निर्माण होण्यापूर्वी त्यावर योग्य तोडगा काढणे अत्यंत गरजेचे असल्याचे ग्रामसभेत प्रकर्षाने मांडण्यात आले. चिखलीचे सरपंच कमलाप्रसाद यादव यांनी यासंदर्भात माहिती देताना स्पष्ट केले की, ग्रामपंचायतीतर्फे लवकरच संबंधित खाते, उच्च अधिकारी आणि संबंधित मंत्र्यांना औपचारिक पत्र लिहून या अत्यंत आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांसाठी तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती केली जाईल.
उपसरपंच ऐश्वर्या कोरगावकर यांनी या विषयावर बोलताना सांगितले की, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP) उभा करण्यासाठी गावातील काही ठिकाणी जागा निश्चित करण्यात आली होती. परंतु, स्थानिक रहिवाशांकडून विरोध होत असल्यामुळे हे प्रस्ताव पुढे नेण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. या समस्येवर योग्य त्या कायदेशीर मार्गातून आणि संवाद साधून मार्ग काढण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली, जेणेकरून प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेला मलनिःसारण पायाभूत सुविधांचा प्रश्न मार्गी लावता येईल. ग्रामसभेच्या या ठरावामुळे गावातील सांडपाण्याच्या समस्यांचे निराकरण करून पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे पडले आहे.
दरम्यान, ग्रामसभेत इतरही काही स्थानिक मुद्यांवर बरीच चर्चा झडली. सांडपाण्याचा प्रश्न पूर्ण सुटेपर्यंत गावात कोणत्याही नवीन बांधकामांना परवानग्या देऊ नयेत, अशी मागणी स्थानिकांनी लावून धरली. तसेच, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि मंत्री मौविन गॉडिल्लो यांच्या हस्ते नुकत्याच पार पडलेल्या महिला भवनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात सरपंचांना निमंत्रण देण्यात आले नसल्याचा मुद्दा गावकऱ्यांनी उपस्थित केला. या प्रकारामुळे सरपंच आणि स्थानिकांच्या भावना दुखावल्या असून चुकीचा पायंडा पडल्याची भावना व्यक्त करण्यात आली. सरपंचांनीही आपल्याला या कार्यक्रमाची कोणतीही माहिती किंवा निमंत्रण दिले नसल्याचे स्पष्ट करत नाराजी व्यक्त केली.


