नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी केरी आजोबा देवस्थानात वाद

केरी येथील श्री सातेरी केळबाय आजोबा देवस्थानात नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी महाजन गटांमध्ये वाद उफाळल्याने मंदिर परिसरात तणावाचे वातावरण होते. संयुक्त मामलेदार विष्णू राणे यांच्या मध्यस्थीनंतर पूजा-अर्चा करून पहिल्या दिवसाचा कार्यक्रम आटोपता घेण्यात आला. मात्र, पुढील उत्सव सुरू राहणार की नाही, याबाबत अनिश्चितता आहे.


3 hours ago
नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी केरी आजोबा देवस्थानात वाद

केरी येथील श्री सातेरी केळबाय आजोबा देवस्थानात महाजन गटाशी चर्चा करताना संयुक्त मामलेदार विष्णू राणे.
गोवन वार्ता प्रतिनिधी
वाळपई
सत्तरी तालुक्यातील केरी येथील श्री सातेरी केळबाय आजोबा देवस्थानात नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी महाजन गटांमध्ये वाद उफाळल्याने धार्मिक कार्यक्रमाला गालबोट लागले. जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वी दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोप करत राणे हळीद आणि माजीक गटांनी आक्षेप घेतला. धार्मिक विधी आणि पूजाअर्चेच्या अधिकारांवरून निर्माण झालेल्या या वादामुळे मंदिर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. संयुक्त मामलेदार विष्णू राणे यांच्या मध्यस्थीनंतर पुरोहितांच्या हस्ते आवश्यक पूजा-अर्चा करून पहिल्या दिवसाचा कार्यक्रम आटोपता घेण्यात आला. मात्र, पुढील नऊ दिवसांचा उत्सव सुरू राहणार की नाही, याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
२०२१ मध्ये तत्कालीन मामलेदारांनी दिलेल्या निर्देशांनुसार देवस्थानातील पूजा-अर्चा पुरोहितांच्या माध्यमातून, तर दैनंदिन उत्सव आणि संबंधित कामकाज देवस्थान समितीने पार पाडावे, अशी व्यवस्था निश्चित झाल्याचे संबंधित महाजन गटांचे म्हणणे आहे. याच व्यवस्थेनुसार नवरात्रोत्सव साजरा करण्यावर चार दिवसांपूर्वी वाळपई येथील मामलेदार कार्यालयात झालेल्या बैठकीत सर्व महाजन गटांचे एकमत झाल्याचा दावा करण्यात येत आहे. असे असतानाही प्रत्यक्ष उत्सवावेळी या निर्णयाची अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोप करण्यात आला.समितीवर मनमानीचा आरोप
देवस्थान समितीने संबंधित गटांना विश्वासात न घेता मनमानी कारभार केल्याचा आरोप राणे हळीद, माजीक आणि अन्य महाजन गटांनी केला आहे. तीन महाजन गटांवर अन्याय झाल्याचा दावा करत संबंधितांनी ठरलेल्या व्यवस्थेनुसारच धार्मिक विधी पार पाडण्याची मागणी केली. इतर समाजगटांना धार्मिक विधी करण्याचे अधिकार देण्याच्या प्रयत्नांनाही त्यांनी आक्षेप घेतला.
कृष्णा माजीक यांनी समितीवर निर्देशांची अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला. बैठकीत एकमत झाल्यानंतरही त्यानुसार कार्यवाही न झाल्याने वाद निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. अन्याय सहन केला जाणार नसून, गरज पडल्यास न्यायासाठी कायदेशीर लढा देण्यात येईल, असा इशाराही संबंधित गटांच्या वतीने देण्यात आला.संयुक्त मामलेदारांचा हस्तक्षेप
वाद वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन संयुक्त मामलेदार विष्णू राणे यांनी घटनास्थळी उपस्थित महाजन गटांशी चर्चा केली. सर्वांची भूमिका समजून घेत तणाव निवळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, धार्मिक विधींच्या अधिकारांबाबत एकमत न झाल्याने संपूर्ण धार्मिक प्रक्रिया पार पाडता आली नाही. अखेरीस पुरोहितांच्या हस्ते आवश्यक पूजा-अर्चा करण्यात आली.
संयुक्त मामलेदार विष्णू राणे यांनी सांगितले की, देवस्थानात आवश्यक पूजा-अर्चा झाली; मात्र पुढील धार्मिक प्रक्रिया पार पाडण्यास काही महाजन गटांनी विरोध केल्याने ती पूर्ण करता आली नाही. देवस्थानातील अधिकारपदावरून गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू असून, नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने परिस्थिती अधिक चिघळू नये, यासाठी काळजी घेण्यात आली. मंदिर परिसरातील तणाव नियंत्रणात आणण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, वाळपई पोलीस स्थानकाचे निरीक्षक विदेश पिळगावकर पोलीस बंदोबस्तासह घटनास्थळी उपस्थित होते. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली. मात्र, २०२१ मधील निर्देशांची अंमलबजावणी, समितीची जबाबदारी आणि धार्मिक विधींचे अधिकार यांवरील मतभेद कायम आहेत. त्यामुळे पुढील नऊ दिवसांचा नवरात्रोत्सव कशा पद्धतीने साजरा होणार, याकडे भाविकांचे लक्ष लागले आहे.
२०२१ च्या निर्देशांवरून वाद
पूजा-अर्चा पुरोहितांमार्फत करण्याची व्यवस्था असल्याचा महाजन गटांचा दावा.
चार दिवसांपूर्वीच्या बैठकीत निर्देशांनुसार उत्सव साजरा करण्यावर एकमत झाल्याचे म्हणणे.
निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याचा समितीवर आरोप.
अन्याय झाल्यास कायदेशीर लढा देण्याचा इशारा.
पहिल्या दिवसाचा कार्यक्रम आटोपता
महाजन गटांतील मतभेदांमुळे मंदिर परिसरात तणाव.
संयुक्त मामलेदार विष्णू राणे यांचा मध्यस्थीचा प्रयत्न.
पुरोहितांच्या हस्ते आवश्यक पूजा-अर्चा.
पुढील नऊ दिवसांच्या उत्सवाबाबत अनिश्चितता कायम.

हेही वाचा
सर्व पहा