अजित शंखवाळकरच्या शोधात पणजी पोलिसांचे पथक महाराष्ट्रात

संशयिताची दोन बँक खाती गोठविण्याची प्रक्रिया सुरू

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
11th October, 11:46 pm
अजित शंखवाळकरच्या शोधात पणजी पोलिसांचे पथक महाराष्ट्रात

पणजी : येथील उत्पादन शुल्क बनावट आयुक्त प्रकरणातील संशयित अजित शंखवाळकर याचा शोध घेण्यासाठी पणजी पोलिसांचे एक पथक मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्रात ठाण मांडून आहे. दरम्यान, पोलिसांनी संशयिताची दोन बँक खाती गोठविण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे. तसेच त्याच्या विरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे.

या प्रकरणी उत्पादन शुल्क खात्याचे साहाय्यक आयुक्त संकेत साखरदांडे यांनी तक्रार दाखल केली आहे. संशयित अजित शंखवाळकर याने मनोज तळेकर याला सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन देऊन त्याच्याकडून २७ लाख रुपये उकळले. त्यानंतर तळेकर याला उत्पादन शुल्क आयुक्त म्हणून तत्कालीन आयुक्त आश्विन चंद्रू (आयएएस) यांच्या नावे पदाचा पदभार सोपविल्याचे पत्र दिल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी पणजी पोलिसांनी संशयित अजित शंखवाळकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

याच दरम्यान मनोज तळेकर याच्या वडिलांनी पणजी पोलीस स्थानकात आणखीन एक तक्रार दाखल केली आहे. त्यात संशयित अजित शंखवाळकर याने त्यांचा मुलगा आणि मुलीला सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवून ५२ लाख रुपयांचा गंडा घातल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी पणजी पोलिसांनी शंखवाळकर याच्या विरोधात दुसरा गुन्हा दाखल केला. दरम्यान संशयित शंखवाळकर फरार अाहे. या प्रकरणी निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रोहन मडगावकर यांच्या नेतृत्वाखाली एक पथक ९ रोजी महाराष्ट्रात रवाना करण्यात आले आहे. सदर पथक संशयित शंखवाळकर याचा शोध घेत आहे.

लुकआऊट नोटीस जारी करण्यासाठी प्रक्रिया 

अजित शंखवाळकर फरार झाला आहे. पोलिसांनी त्याची दोन बँक खाती गोठविण्यासाठी तसेच त्याच्या विरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. 


हेही वाचा
सर्व पहा