विनापरवाना कॅटरर्स, पार्टी हॉलसाठी तीन आठवड्यांत परवाना घ्या!

एफडीएचा इशारा : अन्यथा कायदेशीर कारवाईसह १० लाख दंड

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
08th October, 11:27 pm
विनापरवाना कॅटरर्स, पार्टी हॉलसाठी तीन आठवड्यांत परवाना घ्या!

पणजी : राज्यातील विनापरवाना कॅटरर्स आणि नोंदणी नसलेल्या पार्टी हॉल्सविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) विशेष मोहीम हाती घेतली आहे. पुढील तीन आठवड्यांत एफएसएसएआय परवाना घेण्यासाठी संबंधितांना अर्ज करण्याचे निर्देश देण्यात आले असून, त्यानंतर विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईसह १० लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो, असा इशारा एफडीएने दिला आहे.
एफडीएच्या संचालक श्वेता देसाई यांनी यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. संबंधित व्यावसायिकांनी foscos.fssai.gov.in या संकेतस्थळावरून किंवा बांबोळी येथील एफडीए मदत केंद्राच्या माध्यमातून परवान्यासाठी अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. समारंभ, उत्सव, धार्मिक विधी किंवा संस्थांमध्ये १० ते २५ किंवा त्याहून अधिक लोकांसाठी अन्न तयार करणे, साठवणे, वाढणे किंवा वाहतूक करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांचा कॅटरर्समध्ये समावेश होतो. 
कॅटरर्सना एफएसएसएआय परवाना घेण्यासोबतच स्वच्छता नियमांचे काटेकोर पालन करणे आणि अन्न हाताळणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला वैध स्वच्छता कार्ड देणे बंधनकारक आहे. हे नियम बँक्वेट हॉल, खासगी हॉल तसेच अन्न शिजवण्याची किंवा वाढण्याची सुविधा असलेल्या धार्मिक स्थळांशी संलग्न हॉलनाही लागू आहेत.
पार्टी हॉलच्या आवारात एफएसएसएआय परवाना किंवा नोंदणी प्रमाणपत्र प्रदर्शित करणे, योग्य कचरा व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वयंपाकघरासाठी कायमस्वरूपी पक्की रचना आणि स्वच्छतेचे नियम पाळणे आवश्यक आहे.
घरातून, वाहनांतून व्यवसाय करणाऱ्यांनाही इशारा
घरातून, वाहनांतून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून विनापरवाना अन्न व्यवसाय करणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार असल्याचे एफडीएने स्पष्ट केले आहे. अशा विक्रेत्यांनी आवश्यक परवाने व नोंदणी करून स्वच्छता नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.

हेही वाचा
सर्व पहा