डिचोली : कारापूर सर्वण येथील धावस्करवाडा परिसरात दोन गटांमध्ये झालेल्या मारहाण प्रकरणात धावस्कर कुटुंबातील नऊ जणांपैकी आठ जणांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे, अशी माहिती धावस्कर कुटुंबीयांचे वकील ॲड. कृपा पिळर्णकर यांनी दिली. या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून अटक करण्यात आलेल्या सर्वेश धावस्कर याच्या जामीन अर्जावर सोमवारी निर्णय जाहीर होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
हल्ल्यापूर्वी दुसऱ्या गटाने कथितरीत्या केलेल्या नियोजनाचे ऑडिओ रेकॉर्डिंग पोलिसांना देण्यात आल्याचा दावा ॲड. पिळर्णकर यांनी केला. ही रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर हल्ला पूर्वनियोजित असल्याचे स्पष्ट होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. गौरेश घाडी यांना लक्ष्य करून त्यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी फेटाळला. हल्ल्याच्या दिवशी दुसऱ्या गटाने आधीच नियोजन करून वेळ निश्चित केली होती, असे ऑडिओ रेकॉर्डिंगवरून दिसून येत असल्याचा दावा त्यांनी केला.
या घटनेत धावस्कर कुटुंबातील रामा ऊर्फ पप्पू धावस्कर यांच्या डोक्याला दुखापत झाली असून, त्यांना सात ते आठ टाके पडल्याचे ॲड. पिळर्णकर यांनी सांगितले. अर्जुन धावस्कर यांचा पाय फ्रॅक्चर झाल्याची माहितीही त्यांनी दिली. धावस्कर कुटुंबातील काही सदस्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असले, तरी त्यापैकी काही जण घटनास्थळी उपस्थित नव्हते. ते त्यावेळी आपली ड्युटी करत होते. यासंदर्भातील पुरावेही उपलब्ध असल्याचा दावा त्यांनी केला.
धावस्कर कुटुंबातील नऊ सदस्यांसाठी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केल्यानंतर पोलिसांकडून कुटुंबीयांवर दबाव वाढविण्यात आल्याचा आरोपही ॲड. पिळर्णकर यांनी केला. एका सदस्याला आमच्या ताब्यात द्या, अन्यथा सर्वांना अटक करू, अशाप्रकारे दबाव आणण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर संबंधित सदस्याला पोलीस स्थानकात शरण जाण्यापूर्वीच अटक करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.
या हल्ल्याचा कोणत्याही देवळाशी किंवा ‘द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा’ या प्रकल्पाशी संबंध नसल्याचे ॲड. पिळर्णकर यांनी स्पष्ट केले. या घटनेला विनाकारण राजकीय रंग दिला जात असल्याचा आरोप करत, गावातील नागरिकांनी या बाबीचा विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.
दिवाळीच्या पूर्वसंध्येला नरकासुराच्या दिवशी एका बारमध्ये झालेल्या किरकोळ वादातून हा प्रकार घडल्याचे ॲड. पिळर्णकर यांनी सांगितले. त्या वादाला आता राजकीय स्वरूप दिले जात असल्याचेही त्यांनी म्हटले.
धावस्कर कुटुंबीय पोलिसांच्या तपासात पूर्ण सहकार्य करत असल्याचे सांगून, या प्रकरणाची पुढील सुनावणी २६ नोव्हेंबर रोजी होणार असल्याची माहिती ॲड. पिळर्णकर यांनी दिली.


